सोने-चांदी आवडे चोरांना! : नंदुरबारमध्ये दरोडा; घर फोडून सगळं सोडलं, फक्त सोने-चांदीचे दागिने पळवले!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात चोरांचा उच्छाद सुरूच असून, चोरांना विशेषत: सोने-चांदीच्या दागिन्यांवर विशेष प्रेम जडले असल्याचे गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. आताही नंदुरबारच्या वाघोदा शिवारात चोरट्यांनी एक घर फोडून मोठी चोरी केली असून, घरातील एकाही वस्तूला हात न लावता केवळ सोने- चांदीचे दागिने चोरून नेले आहेत.
याआधी शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील माता मंदिरात झालेल्या चोरी चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारतानाच दानपेटी फोडली होती. यानंतर अक्कलकुवा तालुक्यातही चोरट्यांनी जैन मंदिरात प्रवेश करून मूर्तीवरील दागिने व चांदीचे श्रीफळ पळवले होते. या दोन्ही चोऱ्यांचा तपास लागलेला नसतानाच आता नंदुरबार शहरात वाघोदा शिवारातील एक घर फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचे फक्त सोने-चांदीचे दागिने पळवून नेले.
नंदुरबार उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप रामकृष्ण चौधरी (रा. प्लॉट नं. ३८, बी राज सिटी – २, वाघोदा शिवार, नंदुरबार) यांनी या चोरीसंदर्भात फिर्याद दिली. २० एप्रिलच्या रात्री ९.३० ते २१ एप्रिलच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करीत लोखंडी कपाटाचे लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने पळवले. यामध्ये सोन्याच्या दोन नथ, तीन अंगठ्या, सोन्याचे दोन तुकडे, कानातील तीन रिंग, चांदीचे सहा पैंजण, सहा जोड चांदीचे जोडवे, एक चांदीचा दिवा अशा ऐवजाचा समावेश आहे.
आता या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, श्रेणी पोलीस Aउपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.



