महाराष्ट्र

‘मेल्‍यानंतर काय केले, हे पाहता येणार नाही, म्‍हणत सरपंचाने जिवंतपणीच घातला स्‍वत:चा दहावा; पिंडदानही उरकले!; विधीसाठी पाहुण्‍यांसह गावकर्‍यांचीही उपस्‍थिती

अहिल्‍यानगर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : “मेल्यानंतर कोणी काय केले हे पाहायला मी जिवंत असणार नाही, मग जे काही करायचे आहे ते डोळ्यादेखत का नको?”, असे म्‍हणत नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी चक्क जिवंतपणीच स्वतःचे ‘पिंडदान’ आणि ‘दहाव्याचा’ विधी उरकला आहे. माणसाच्‍या मृत्‍यूनंतर केल्या जाणाऱ्या क्लेशदायक कर्मकांडांना फाटा देण्यासह अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी आरगडे यांनी जिंतपणीच हा विधी करून घेत सर्वांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
स्‍वत: शरद आरगडे, त्यांच्या पत्नी आणि मुलाने २१ एप्रिल रोजी पार पडलेल्‍या या आगळ्यावेगळ्या विधीमध्ये सहभाग घेतला. हिंदू धर्मात व्यक्तीच्या निधनानंतर दहाव्या दिवशी पिंडदान आणि उत्तरकार्य करण्याची प्रथा आहे. मात्र, “मेल्यानंतर कोणी काय केले हे पाहायला मी जिवंत असणार नाही, मग आपल्‍या डोळ्यादेखतच सर्व विधी उरकून घेऊ” असा विचार करून आरगडे यांनी हा निर्णय घेतला.
आरगडे यांच्‍या निर्णयाला कुटुंबीयांनीही साथ देत त्यांच्या पत्नी व मुलाने शास्त्रोक्त पद्धतीने विधी करत जिवंतपणीच त्यांचे पिंडदान केले. विशेष म्हणजे या विधीवेळी अनेक कावळ्यांनीही पिंडाला स्पर्श केल्याने उपस्थितही आश्‍चर्यचकित झाले.
मृत्यूनंतर आत्मा शांत होतो किंवा ठराविक विधी केल्यानेच गती मिळते, यासारख्या समजुतींना फाटा देत सामाजिक प्रबोधन, भावनांच्या नावाने होणारी कुटुंबाची आर्थिक पिळवणूक थांबली पाहिजे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे आरगडे यांनी यावेळी सांगितले.
बांगड्या फोडू नको, मंगळसूत्र काढू नको “माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीने कोणत्याही विधवा प्रथा पाळू नयेत, तिने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये. आपल्‍या मृत्यूनंतर सुतक पाळू नये किंवा धार्मिक कर्मकांड करू नये,” असे स्पष्ट नमूद करणारे कायदेशीर प्रतिज्ञापत्र देखील त्यांनी तयार केले आहे. एकंदरीतच या अनोख्या ‘दहाव्याच्या’ कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button