मुख्य बातम्या

नंदुरबारच्या विराज चौधरी गँगला ‘एसपीं’चा दणका; सर्व ९ सदस्य दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार; धडाकेबाज कारवाईने जिल्‍ह्यात खळबळ!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचण्याचा विडा उचललेले पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी आणखी एका टोळीवर धडाकेबाज कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षकांनी नंदुरबार शहरात वेगवेगळ्या गुन्हेगारी कृत्यांसह दहशत माजवणाऱ्या विराज दीपक चौधरी व त्याच्या टोळीतील नऊ सदस्यांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. या धडक कारवाईच्‍या माध्‍यमातून जिल्‍हा पोलीस अधीक्षकांनी नंदुरबार जिल्‍ह्यात गुन्‍हेगारी कृत्‍यांना थारा दिला जाणार नसल्‍याचा थेट इशाराच दिल्‍याचे मानले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळी प्रमुख विराज दीपक चौधरी (२७), गोलू उर्फ योगेश रघुनाथ चौधरी (२९), सिद्धार्थ राजेश शहा (२८), लोकेश उर्फ लकी दिलीप चौधरी (२९), भैय्या उर्फ राकेश राजेंद्र चौधरी (३२), चेतन दिलीप चौधरी (२८), विजय उर्फ विकी राजेंद्र चौधरी (२२), मयूर उर्फ मेरी मधुकर चौधरी (२२, सर्व रा. चौधरी गल्ली, नंदुरबार) अशी हद्दपार करण्यात आलेल्या नऊ जणांची नावे आहेत. या सर्वांवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यात खून, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, शारीरिक इजा पोहोचवणे, गंभीर दुखापत करणे, संघटित गुन्हेगारी कारवाया, घरात बेकायदा प्रवेश करणे, मारहाण करणे, जुगार करणे, बेकायदेशीर दारू बाळगणे, परिसरातील शासकीय वाहनांवर दगडफेक करून त्यांचे नुकसान करणे, बेकायदेशीर हत्यारे बाळगून दहशत माजवणे, जिल्हाधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या मनाई आदेशाचे वारंवार उल्लंघन, प्रतिबंधात्मक कारवायांचे उल्लंघन (ब्रीच ऑफ बॉण्ड) अशा गुन्हेगारी कारवायांचा समावेश आहे.
वारंवार समज देऊन कारवाई करूनही या टोळीची गुन्हेगारी कृत्ये कमी होत नसल्याने अखेर पोलीस अधीक्षकांनी या टोळीवर कायद्याचा बडगा उगारला आहे. या सर्वांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. यासाठी श्रवण दत्त एस. यांनी हद्दपार प्राधिकरण अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून असलेल्या विशेष अधिकारांचा वापर केला आहे.
महिनाभरात दुसरी हद्दपारीची कारवाई
याआधी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी २७ मार्च रोजी बिरसा फायटर्स संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा याच्यासह नऊ जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस प्रमुखांनी दोन वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार केले होते. त्या सर्वांवरही सार्वजनिक ठिकाणी टोळी जमवून मारामारी करणे, धमक्या देणे, शासकीय कामात अडथळा, सार्वजनिक शांततेत बाधा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे अशा गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर आता अवघ्या महिनाभराच्या आतच दुसऱ्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button