नंदुरबारमध्ये लोकांच्या जीवावर उठलेली अवजड वाहने पोलिसांच्या रडारवर; तीन चालकांवर थेट गुन्हा
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव वेगात बेदरकारपणे रस्त्यांवर धावून लोकांच्या जीवावर उठलेल्या अवजड वाहनांवर अखेर नंदुरबार पोलिसांनी कडक कारवाईचा आसूड उगारला आहे. या अवजड वाहनांच्या चालकांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली असून, एकाच दिवसात अशा तीन वाहन चालकांवर नंदुरबारच्या पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार शहर व जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून, यातील बहुतांश अपघात अवजड वाहनांमुळे झाल्याचे एकंदरीत आकडेवारीतून पुढे आले होते. विशेषत: नंदुरबार ते उमर्दे रस्त्यावर अवजड वाहनांच्या चालकांचा बेदरकारपणा खुपच वाढला असून, या संदर्भातील वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता नंदुरबार पोलिसांनी अशा लोकांच्या जीवावर उठलेल्या वाहन धारकांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमेंतर्गत शनिवारी एकाच दिवसात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दोन तर तालुका पोलिस ठाण्यात एक असे एकूण तीन गुन्हे दाखविण्यात आले. हा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डम्पर (क्र. जीजे २१ डब्ल्यू ७०९६) चा चालक अर्जुन रमेश भिल (३३, रा. खामगाव, ता. व जि. नंदुरबार), आयशर (क्र. एमएच ०४ जीसी ३०१९) चा चालक जयसिंग रमणसिंग वळवी (३२, रा. भादवड, ता. नवापूर, जि. नंदुरबार) आणि अन्य एका आयशर (क्र. केए २२ डी ८३६२) चा चालक राजू गुंडाप्पा मेकली (३७, रा. गांधीनगर, बेडगाव, ता. व जि. बेडगाव) यांचा समावेश आहे.
या तिघांविरोधातही रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम २८१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांचा तपास अनुक्रमे पोलिस उपनिरीक्षक रचना शिंदे, हवालदार गायत्री पवार व पोलिस नाईक राजेश्वरी गावित करीत आहेत.



