‘शबरी’च्या घरकुल लाभार्थ्यांना मिळणार २.५ लाख; एक हजार रुपयांची अटही शिथिल, पण दलालांपासून सावधान, आ. रघुवंशी थेटच बोलले…

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शबरी आदिवासी घरकुल योजनेत आता लाभार्थ्यांना दीड नव्हे तर अडीच लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. शिवाय ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नगर पालिकेकडे भरावी लागणारी एक हजार रुपयांची अटही शिथिल करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचे सर्व अधिकार पालिकेलाच आहेत. इतर कुणी योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून पैसे मागत असेल तर थेट तक्रार करून त्याला जेलची हवा खाऊ घाला, अशा शब्दांत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींची फसवणूक करणार्यांना एकप्रकारे थेट इशाराच दिला.
‘शबरी आदिवासी घरकुल योजना’च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नंदुरबार नगर पालिकेच्या वतीने आदिवासी बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अटलबिहारी वाजपेयी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. रघुवंशी म्हणाले, या योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यापूर्वी जमिनीचा पट्टा संबंधित कुटुंबाच्या नावे करण्यात येईल. त्यानंतरच कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित लाभार्थ्याला घरकुल मंजूर केले जाईल. मात्र, आदिवासी बांधवांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन काही दलाल योजनेचा फायदा मिळवून देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. परंतु, या योजनेचे अधिकार केवळ पालिकेकडे आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांनी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे केवळ पालिकेच्या कर्मचार्यांकडेच जमा करावीत. इतर कुणी यासाठी पैशाची मागणी केली तर थेट माझ्याकडे तक्रार करावी. योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करताना लागणारा उत्पन्नाचा दाखला आमदार कार्यालयातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही आ. रघुवंशी यांनी सांगितले.
या बैठकीला ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. रवींद्र चौधरी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, नगरसेवक रवींद्र पवार, माजी प्रशांत चौधरी, चेतन वळवी, भूषण नेरे, बांधकाम अभियंता गणेश गावित आदी उपस्थित होते.



