नंदुरबार जिल्हा

तळोदा तालुक्‍यात ऊसाच्या शेतात आढळले बिबट्याचे पिलू; वळवळ पाहून शेतकर्‍याचे लक्ष गेल्‍याने अनर्थ टळला; आता मादीच्‍या शोधासाठी ‘ट्रॅप’

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : तळोदा तालुक्यातील हलालपुर शिवारात ऊसाच्या शेतात बिबट्याचे पिलू आढळल्‍याने परिसरात खळबळ उडाली आहे. शेतात काम करताना शेतकर्‍याची नजर एका ठिकाणी हालचाल दिसल्‍याने जवळ पाहिल्‍यावर त्‍यांना हे पिलू दिसून आले. ही घटना समोर आल्‍यानंतर परिसरात घबराट पसरली असून, वनविभागाने हे बिबट्याचे पिलू ताब्‍यात घेतानाच त्‍याच्‍या आईच्‍या शोधार्थ परिसरात ट्रॅप लावला आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या तळोदा तालुक्‍यातील हलालपूर येथील बबनलाल ताराचंद परदेशी यांच्या शेतमळ्यात हे बिबट्याचे पिलू आढळून आले. त्यांचा मुलगा संजय परदेशी ऊसाला पाणी देत असताना शेतातील झोपडीजवळ हालचाल जाणवली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तेथे बिबट्याचे पिलू लपून बसल्याचे दिसून आले.
त्‍यांनी तत्‍काळ आवाज देऊन सहकार्‍यांना त्‍याठिकाणी बोलावले. यानंतर अनिल परदेशी यांनी तत्काळ वनविभाग आणि पोलिसांना माहिती दिली. वनविभागाचे वनक्षेत्रपाल शंतनु सोनवणे, वनरक्षक गिरधन पावरा, गोवर्धन वसावे व वाहन चालक दीपक बाळदे घटनास्थळी दाखल झाले. ते पिलू जखमी अवस्‍थेत होते. त्यांनी बिबट्याच्‍या पिलाला ताब्यात घेत पशुवैद्यकीय उपचारासाठी तळोदा येथे हलवले. तेथे उपचाराअंती त्‍याची प्रकृती सुधारली असून, सध्या हे पिलू चांगल्‍या अवस्‍थेत असल्‍याचे वनविभागातर्फे सांगण्‍यात आले.
वनविभागाने पिलाला निगराणीत ठेवले असून, त्‍याची आई बिबट मादी याच परिसरात फिरत असल्‍याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने या परिसरात ट्रॅप लावला असून, लाईव्‍ह कॅमेर्‍यांच्‍या साह्याने या मादीचा शोध घेतला जात आहे.
सध्‍या तळोदा तालुक्‍यात अनेक शेतांमध्‍ये उसाची तोडणी सुरू असून, तोडणीनंतर पालापाचोळा जात आहे. अशाच आगीत हे पिलू होरपळून जखमी झाल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. या परिसरात बिबट्यांचा वावर नेहमीच असल्‍याने ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button