नवापूरच्या पानबारा डोंगरातील वणवा थांबेना; आगीने धारण केले रौद्ररूप, संपूर्ण परिसरात आगीचे लोट, जैवविविधता धोक्यात, भीतीचे वातावरण
विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाट परिसरातील पानबारा गावाजवळील डोंगराळ भागात पेटलेल्या आगीने भीषण रूप धारण केले आहे., दोन दिवसांपासून प्रयत्न करूनही या आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यात यश आलेले नसल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. आग वाढतच चालल्याने परिसरात धुराचे लोट उसळले असून, वाढत्या आगीमुळे जंगलातील जैवविविधता धोक्यात आली आहे. ही आग विझविण्यासाठी वनविभागाच्या कर्मचार्यांचे शर्थीचे प्रयत्न अद्याप सुरूच आहेत.
कोंडाईबारी घाटातील पानबारा डोंगराळ भागात दोन दिवसांपूर्वी अचानक आग लागली होती. ही आग वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे लागली की कुणी मुद्दामहून लावली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, आग लागल्याची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक व वनमजूर मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. वनमजूर दिलीप गावित, पांडुरंग गावित, सुदाम गावित, रामू गावित, दशरथ गावित, जया गावित आणि पिंट्या गावित यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पानबारा गावातील रोहित गावित, विजय सिंग गावित, ज्योतिलाल गावित व कांत्या गावित यांसह ग्रामस्थांनीही धाडसाने मदत करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र जोरदार वाऱ्यामुळे आग सतत पसरत असल्याने ती पूर्णपणे नियंत्रणात आणणे आव्हानात्मक ठरत आहे. या वनव्यात जंगलातील अनेक झाडे, वनस्पती, कीटक-जंतू तसेच पक्ष्यांची घरटी आणि पिलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सलग दोन दिवसांच्या प्रयत्नानंतरही ही आग पूर्ण:त आटोक्यात आलेली नसून, उलट वणवा वाढतच चालल्याने डोंगर परिसरात धूर आणि ज्वाळांचे भयावह दृश्य दिसत आहे. त्यातच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान, वन विभागाकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



