रिक्षाचालकांची मुजोरी, प्रवाशांच्या जीवाशी खेळ; घरगुती गॅस भरून रिक्षा चालवल्या रस्त्यावर; ५० रिक्षा जप्त, आता थेट चालणार बुलडोझर, आरटीओची धडक कारवाई

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : एकीकडे टंचाईमुळे जनतेला घरगुती गॅसचे सिलिंडर मिळणे दुरापास्त झालेले असतानाच काही रिक्षाचालक मात्र आपल्या रिक्षात अवैधरित्या हाच घरगुती गॅस भरून रस्त्यावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबारमध्ये उघडकीस आला आहे. ही बाब उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) कानावर येताच त्यांनी कडक कारवाई करीत अशा ५० रिक्षा पकडून जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे यातील ६० टक्के रिक्षाचालक वाहन चालविण्याचा परवाना संपूनही रिक्षा चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून, आता या रिक्षा बुलडोझर चालवून कायमच्या नष्ट करण्याचा निर्णय ‘आरटीओ’ने घेतल्याचे सांगण्यात आले.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात घरगुती ग्राहकांना गॅसचे सिलिंडर मिळेनासे झाले आहे. व्यावसायिकांना एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णत: बंद झाला आहे. असे असताना जिल्ह्यात अनेक वाहनचालक आपल्या वाहनात अवैधरित्या घरगुती गॅस भरून वाहने चालवित असल्याच्या तक्रारी ‘आरटीओ’कडे आल्या होत्या. ‘आरटीओ’च्या पथकांनी रस्त्यांवर फिरून असा काळाबाजार करणार्यांमध्ये सर्वाधिक रिक्षाचालक असल्याची माहिती काढली आणि थेट तपासणी मोहिम हाती घेऊन त्यांच्यावर कारवाई सुरू केली.
५० जण अडकले; ६० टक्के चालकांकडे परवानाच नाही
‘आरटीओ’ पथकांच्या या कारवाईत नंदुरबार शहर व जिल्ह्यात घरगुती गॅसचा गैरवापर करणारे तब्बल ५० रिक्षाचालक जाळ्यात अडकले. धक्कादायक बाब म्हणजे यातील बहुतांश चालकांकडे रिक्षा गॅसवर चालविण्याचा परवानाच नव्हता. यानंतर ‘आरटीओ’ने या सर्व रिक्षा जप्त केल्या. या सर्व रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे यातील ३० हून अधिक रिक्षाचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालवून ते प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याची धक्कादायक माहिती त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केल्यावर समोर आली. तर काही रिक्षा भिवंडी, धुळे, मालेगाव, नालासोपारा येथून भंगारातून आणून नव्याने बांधणी करून, रूपडे बदलून नंदुरबारमध्ये चालविण्यात येत असल्याचेही समोर आले आहे. आता या सर्व रिक्षा बुलडोझर चालवून नष्ट करण्यात येणार आहेत. तसेच रिक्षासह अन्य वाहनांत अवैधरित्या घरगुती गॅस भरून वाहन रस्त्यावर चालविल्यास चालक व मालकांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ‘आरटीओ’कडून देण्यात आली आहे.



