गुड न्यूज : नंदुरबारच्या उमापती महादेव मंदिर परिसरातील ४.५ एकरवरील अतिक्रमण होणार नियमित; आ. रघुवंशींच्या मागण्यांना महसूलमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा)- शहराचे वैभव असलेल्या शंभग़ वर्षांपूर्वीच्या प्राचीन उमापती महादेव मंदिर परिसरातील साडेचार एकर शासकीय जागेवरील अतिक्रमण लवकरच नियमित होण्याचे संकेत बुधवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देण्यात आले. सोबतच जुन्या तहसीलदार कार्यालयाची ५० टक्के जागा पंचायत समितीच्या नियोजित नव्या इमारतीसाठी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरही बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या दोन्ही महत्त्वपूर्ण मागण्या शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी बावनकुळे यांच्यापुढे मांडल्या होत्या.
या दोन्ही मागण्यांच्या अनुषंगाने मुंबई येथे महसूलमंत्र्यांच्या दालनात बावनकुळे व आ. रघुवंशी यांच्यात बैठक पार पडली. यावेळी आ. रघुवंशी यांनी उमापती महादेव मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व विषद केले. “हे मंदिर शेकडो वर्षांपासून नंदुरबारकरांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिना आणि दसऱ्याच्या सीमोल्लंघनासाठी येथे मोठी गर्दी असते. त्यामुळे मंदिराच्या ताब्यातील ४.५ एकर शासकीय जागा मंदिराच्या नावे नियमित करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी महसूल मंत्र्यांना पटवून दिले.
तसेच, शहरातील प्रशासकीय सोयीसाठी जुन्या तहसील कार्यालयाची ५० टक्के जागा नियोजित पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी देण्याची मागणीही त्यांनी लावून धरली. या दोन्ही विषयांवर महसूलमंत्री बावनकुळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार असून पंचायत समितीलाही हक्काची जागा मिळणार आहे. या बैठकीला महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



