शहादा तालुक्यात भीषण दुर्घटना : आगीत सात एकर ऊस क्षणार्धात भस्मसात; शेतकर्याचे १० लाखांवर नुकसान

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातील मंदाणे शिवारात भीषण दुर्घटना घडली असून, येथील एका शेतकर्याचा तब्बल ७ एकरवरील ऊस अचानक लागलेल्या भीषण आगीत क्षणार्धात जळून खाक झाला. या दुर्घटनेत या शेतकर्याचे सुमारे १० लाखांहून अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
भूषण सैंदाणे (रा. मैंदाणे, ता. शहादा) या शेतकर्याचे गावाला लागूनच शेत असून, यंदा त्यांनी ७ एकरवर उसाची लागवड केली होती. सध्या परिसरात उसतोडणीचे काम सुरू असून, यातच सैंदाणे यांच्या उसाला अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि अवघ्या काही मिनिटांतच सगळ्या उसाची राखरांगोळी झाली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी सैंदाणे यांच्या शेताकडे धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आग संपूर्ण शेतात पसरल्याने हे प्रयत्न व्यर्थ ठरले आणि सगळा उस खाक झाला.
आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी कृषी व महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. या आगीत सैंदाणे यांचे सुमारे दहा लाखांच्या घरात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या आगीमुळे सैंदाणे परिवाराचा उसाचा हंगाम वाया गेला असून, त्यांना कृषी व महसूल विभागाने तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांकडून केली जात आहे.



