मोठी बातमी : विधानभवनात ‘बॉम्बा’बोंब; आत बॉम्ब ठेवल्याचा मेल येताच धावपळ, सगळ्यांना बाहेर रोखले, सर्च ऑपरेशन सुरू

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या विधानभवनात बॉम्ब ठेवल्याच्या शक्यतेने गुरुवारी सकाळपासून धावपळ उडाली आहे. विधानभवनात बॉम्ब ठेवल्याचा इ-मेल विधानभवनाच्या अधिकृत मेल आयडीवर धडकल्याने सार्यांचीच पाचावर धारण बसली असून, सुरक्षितता म्हणून सध्या विधानभवनाचा परिसर सील करून सगळ्यांना बाहेर रोखण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी विधानभवनाचा ताबा घेतला असून, संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे.
सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री तसेच आमदारांची दररोज विधिमंडळात उपस्थिती असते. शिवाय सर्व मंत्री, आमदार अधिवेशन काळात या ठिकाणी भेटत असल्याने त्यांना भेटायला येणार्यांचीही येथे गर्दी राहत आहे. अशातच विधानभवनात बॉम्ब ठेवल्याचा मेल धडकल्याने घबराट निर्माण झाली आहे. हा मेल विधानभवनाच्या अधिकृत मेल आयडीवर आला असून, विधानभवनातील कर्मचार्यांनी कार्यालयीन कामकाज सुरू करून इ-मेल आयडी बॉक्स ओपन करताच त्यांना हा मेल पाहायला मिळाला. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांना दिली. त्यांनी लगेच अलर्ट होत तातडीने या परिसराचा ताबा घेतला आहे. सुरक्षा यंत्रणेतील सर्वच प्रमुख अधिकार्यांनी तातडीने विधानभवनाकडे धाव घेत परिस्थितीची पाहणी सुरू केली आहे. मंत्री, आमदारांसह सर्वांनाच विधानभवनाच्या बाहेर रोखण्यात आले असून, विधानभवनाच्या प्रत्येक कोपर्यात बॉम्बचा शोध घेण्यात येत आहे. विधानभवनात खरेच बॉम्ब ठेवला आहे की ही फक्त अफवा आहे, हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. सर्च ऑपरेशन संपताच पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ शकणार आहे.



