धक्कादायक : नंदुरबारकर जनता घेतेय विषाचा घोट; तब्बल ५३३ जलस्रोतांचे पाणी दुषित; नंदुरबार, शहादा, धडगावकरांना सर्वाधिक धोका
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्त) : नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनता पाणी नव्हे तर विषाचा घोट घेत असून, यामुळे त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ लागला आहे. कारण जिल्ह्यातील तब्बल ५३३ जलस्रोतांचे पाण्याचे नमुने दुषित आढळले असून, यामध्ये सर्वाधिक दुषित पाणी नंदुरबार, शहादा व धडगाव तालुक्यात असल्याचे समोर आले आहे. याशिवाय जिल्हाभरात अनेक ठिकाणी पाण्याच्या नमुन्यांमध्ये टीडीएस आणि जडपणा आढळला असून, यानंतर भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सर्व प्रशासकीय यंत्रणांना अलर्ट केले आहे.
नंदुरबारच्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हाभरातील जलस्रोतांचे सर्वेक्षण करून तेथील पाण्यांचे नमुने गोळा करण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून १८ हजार २४१ पाण्याच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत रासायनिक व विषाणूजन्य तपासणी करण्यात आली. यामध्ये यापैकी तब्बल ५३३ ठिकाणचे पाणी दुषित आणि पिण्यासाठी अयोग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
तपासणीअंती काह.ठिकाणच्या पाण्यांमध्ये जीवाणूंचे प्रमाण अधिक आढळले असून, तेथील पाण्याच्या पुरवठ्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हे दूषित पाणी पिल्यास अतिसार, पोटाचे विकार, टायफॉईड व अन्य संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, तालुकानिहाय विचार करता नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक दूषित पाणी असून, येथे १६३ जलस्रोतांचे पाणी दूषित आढळले आहे. याशिवाय शहादा तालुक्यात १३६, धडगावमध्ये १०१, नवापूरमध्ये ६१, तळोदात ४३ तर अक्कलकुवा तालुक्यात ३० ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले. महत्त्वाचे म्हणजे अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील पाण्यात सर्वाधिक टीडीएस आणि जडपणा आढळला असून, तेथील पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.



