काळजी नको, अल्पसंख्यकांसाठीचा ४. ३७ कोटींचा निधी परत जाणार नाही; शहादा नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी शहरवासियांना केले विश्वस्त

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहराच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी कोणत्याही परिस्थितीत परत जाणार नाही, उलट भविष्यात शहरासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचा विश्वास लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला. यासंदर्भात आज संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शहरवासीयांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला.
नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून शहरात राजकीय वातावरण तापलेले असताना शहराच्या विकासकामांवर त्याचा परिणाम होईल का, शासनाकडून आलेला निधी खर्च होईल की नाही, तसेच शहराचा विकास रखडेल का अशा अनेक प्रश्नांची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, शासनाकडून शहरासाठी मंजूर झालेला ४ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी कोणत्याही परिस्थितीत परत जाणार नाही. उलट हा निधी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करून शहराच्या विकासाला गती दिली जाईल.
पुढे ते म्हणाले की, शहरात काही प्रमाणात राजकीय मतभेद असले तरी सर्व पक्षांचे नगरसेवक शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. येणाऱ्या काळात शहरातील विकासकामे वेळेत पूर्ण होतील आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ दिला जाणार नाही, यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.
सध्या या निधीच्या खर्चाबाबत नगरपालिका की सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत कामे करायची याबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र संबंधित कामे नगरपालिकेची असल्याने नगरपालिकेच्या सक्षम बांधकाम विभागामार्फतच ती करण्यात येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना नगराध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत समाधानकारक उत्तरे दिली. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व पक्षांचे नगरसेवक एकत्रितपणे काम करतील आणि उपलब्ध निधीचा १०० टक्के वापर करून शहराच्या विकासाला गती दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शहराच्या विकासासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले.



