अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करणार्यास १० वर्षांचा सश्रम कारावास; पाच हजारांचा दंडही ठोठावला, शहादातील न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करणार्या व्यक्तीस दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शहादा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायलयाचे न्या. योगेश ए. राणे यांच्या न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला. समाधान विक्रम भिल असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
१८ डिसेंबर २०१७ रोजी शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात ही घटना घडली होती. या ठिकाणी आरोपीने सायंकाळच्या वेळी नदीकिनारी १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला होता. एवढेच नव्हे तर मुलीसह तिच्या वडिलांना आरोपीने ही घटना कुणालाही सांगू नये, अशी धमकीही दिली होती. पुढेही समाधान याने लग्नाचे आमिष दाखवत सदरील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे सुरूच ठेवले होते.
समाधानकडून वारंवार होणार्या अत्याचाराला कंटाळून अखेर मुलीने वडिलांच्या मदतीने सारंगखेडा पोलिस ठाणे गाठून त्याच्याविरोधात रितसर फिर्याद नोंदवली. त्यावरून समाधान भिल याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहादा उपविभागाचे तत्कालिन उपअधीक्षक एम.बी. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. महत्त्वाचे पुरावे हाती आल्यानंतर सारंगखेडा पोलिसांनी योग्य मुदतीत शहादाच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात समाधान भिल याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. योगेश ए. राणे यांच्या न्यायालयापुढे झाली. खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने महत्त्वाचे साक्षीदार व पुरावे तपासण्यात आले. पीडित अल्पवयीन मुलगी, वैद्यकीय अधिकारी, पंच आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी या खटल्यात महत्त्वाच्या ठरल्या. यामध्ये आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्याने न्या. योगेश राणे यांनी समाधान विक्रम भिल याला दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील ॲड. वाय.बी. मोरे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली. मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक हेमंत मोहिते होते. त्यांना हवालदार देविदास सूर्यवंशी, अविनाश बिरारे, शैलेंद्र जाधव यांनी सहकार्य केले.



