तळोदा तालुक्यात भीषण अपघात; ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, एक जागेवरच ठार, दुसरा गंभीर जखमी

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तळोदा तालुक्यातील तलावडी आश्रमशाळेजवळ गुरुवारी (दि. १२) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. ट्रॅक्टर आणि मोटरसायकलची जोरदार धडक होऊन झालेल्या या अपघातात एका तरूण जागीच ठार झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील जांभई येथील सुरुपसिंग जामल्या ठाकरे आणि वासू कुवरसिंग वळवी हे दोघे तरुण गुरुवारी संध्याकाळी तळोदा येथून दुचाकीवरून गावाकडे परतत होते. तलावडी आश्रमशाळेजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रॅक्टरने त्यांच्या मोटरसायकलला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या.
यातील सुरुपसिंग ठाकरे याच्या जखमा अतितीव्र स्वरूपाच्या होत्या आणि वेळेवर मदत न मिळू शकल्याने तो जागीच गतप्राण झाला. तर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी ‘१०८’ रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्यातून सुरुपसिंग ठाकरे याचा मृतदेह आणि जखमी अवस्थेतील वासू वळवी याला तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वळवी याच्यावर उपचार सुरू आहेत.
तळोदा पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून, ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.



