चुलवड ते तलाई रस्ता दुरूस्तीला ४० वर्षांनी लागला मुहुर्त; अखेर खडीकरण, डांबरीकरण सुरू, बिरसा फायटर्सच्या आंदोलनाला यश!

धडगांव / शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : धडगांव तालुक्यातील चुलवड ते तलाई १५ किलोमीटरच्या रस्ता दुरूस्तीसाठी प्रशासनाला तब्बल ४० वर्षांनी मुहुर्त मिळाला आहे. बिरसा फायटर्स संघटनेने या विषयावर सातत्याने केलेली आंदोलने आणि निवेदनांची बरसात याची दखल घेत प्रशासनाने अखेर या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण सुरू केले आहे.
धडगांव तालुक्यातील धडगाव ते नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी व धडगांव- अक्कलकुवाचे माजी आमदार के. सी. पाडवी यांच्या असली या गावाकडे जाणार्या रस्त्याचा मुद्दा बिरसा फायटर्स संघटनेने सातत्याने उचलू धरला होता. मात्र, आमदार, खासदार व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे जनतेचे स्वप्न अपुरेच राहीले होते. विशेषत: या मार्गावरील चुलवड ते तलाई या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. अत्यंत खड्डेमय झालेल्या या रस्त्यावरून चालताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होऊन जखमा होत असल्याने वाहनधारक वैतागले होते. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे धोकादायक झालेल्या या रस्त्यावरून एसटी बसही धावत असल्याने अपघातांची शक्यता खूपच वाढली होती.
या पार्श्वभूमीवर चूलवड ते तलाई रस्त्याचे तत्काळ खडीकरण व डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने दिला होता. या अनुषंगाने संघटनेने तहसीलदार अक्राणी व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना ५ फेब्रुवारी २०२६ रोजी निवेदनही दिले होते. तसेच संघटनेने दोन वर्षांपूर्वी याच रस्त्यावर २ वर्षांपूर्वी घंटानाद आंदोलन तर त्यानंतर शहादातील सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. अखेर बिरसा फायटर्सच्या पाठपुराव्याला व आंदोलनाला यश मिळाले असून, या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे.



