नंदुरबारकर ‘गॅस’वर : ३.२० लाख ग्राहक, रोज लागतात ४५९७ सिलिंडर, ऑनलाईन बुकिंग होईना, काय आहे जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलिंडर वाटपाचे चित्र…
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवांचा बाजार फुल टू जोरात सुरू असून, त्यामुळे नंदुरबारची जनता ‘गॅस’वर पोहोचली आहे. प्रशासन गॅस सिलिंडरचा तुटवडा नसल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात अफवांमुळे जनता गॅस एजन्सींच्या पायर्या झिजवत आहे. त्यातच एजन्सीधारक ॲपवर सिलिंडरची बुकिंग करण्यास सांगत असले तरी सर्व्हर डाऊन असल्याने सिलिंडर बुक होत नसल्याने आणि सिलिंडर किती दिवसात मिळणार याचीही माहिती मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाल्याचे चित्र नंदुरबार शहर व जिल्ह्यात दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धाच्या घडामोडींमुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा सगळीकडे पसरल्या आहेत. यापुढे सिलिंडर मिळणार की नाही, या धास्तीने धडकी भरलेले ग्राहक पुरवठादार एजन्सीवर गर्दी करीत आहेत. नंदुरबार शहरात अशा रांगा दिसत नसल्या तरी जिल्ह्यातील बहुतांश तालुके व मोठ्या गावांतील एजन्सींच्या ठिकाणी मात्र ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. मात्र, तेथे त्यांना ॲपवरच बुकिंग करण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, एकाच वेळी अनेक ग्राहक बुकिंगसाठी प्रयत्न करीत असल्याने ॲपचे सर्व्हर डाऊन होऊन ग्राहकांना सिलिंडर बुक करता येत नसल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे, गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात तत्काळ सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. शिवाय बुकिंग केली तरी सिलिंडर कधी मिळणार, याची धास्ती ग्राहकांना लागली आहे. काही एजन्सीवर तर सात दिवस बुकिंग करूनही सिलिंडर न मिळाल्याने ग्राहक आणि एजन्सीचे कर्मचारी यांच्यात खटकेही उडत आहेत.
जिल्ह्यात घरगुती गॅसचे सुमारे ३ लाख २० हजार ग्राहक असून, त्यांना दररोज ४ हजार ५९७ सिलिंडरचा पुरवठा केला जातो. त्यात हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपी) कडून १,५६५, भारत पेट्रोलियम (बीपी) कडून ४७८ तर इंडिय ऑईल (इंडेन) कडून २,५४४ सिलिंडर पुरवले जातात. सध्या एचपी एजन्सींकडे २,८११, बीपी एजन्सींकडे १,१९७ तर इंडियन ऑईल एजन्सींकडे २,८०६ उपलब्ध आहेत, अशी माहिती देण्यात आली. असे असले तरी ग्राहकांना मागणी करताच सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने मात्र ग्राहकांना ‘पॅनिक’ न होता, संयम बाळगण्याचे तसेच गरज असेल तेव्हाच सिलिंडरची बुकिंग करण्याचे आवाहन केले आहे.



