सातपुडा परिसराचा सर्वांगीण कायापालट करणारा तारा निखळला; ताईसाहेब कमल पाटील यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सातपुडा परिसरातील सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आदरणीय श्रीमती ताईसाहेब कमलताई पाटील यांचे शुक्रवार (दि. १३) रोजी सकाळी सुमारे १० वाजता मुंबई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सातपुडा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. कमलताई पाटील यांची अंतिम यात्रा उद्या, शनिवारी (दि. १४) सकाळी ७.१५ वाजता विद्याविहार येथून निघणार असून, लोणखेडा ता. शहादा येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
ताईसाहेब या अखिल भारतीय गुर्जर महासभेचे माजी अध्यक्ष तथा राज्य एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार कै. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या धर्मपत्नी होत. त्या सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा तसेच अखिल भारतीय गुर्जर महिला महासभेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. सामाजिक, सहकारी आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
अण्णासाहेब पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सातपुडा परिसरातील सर्व समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर कार्य केले. शेवटच्या क्षणापर्यंत समाजकार्याची धुरा सांभाळत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांना चालना दिली. त्यांच्या कार्यामुळे परिसरातील अनेक कुटुंबांना आधार मिळाला.
केवळ नेत्या नव्हे मातृतुल्य व्यक्तिमत्त्व
ताईसाहेब कमलताई पाटील या केवळ नेत्या नव्हत्या, तर परिसरासाठी मातृतुल्य व्यक्तिमत्त्व होत्या. प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, गरजूंच्या मदतीसाठी तत्पर राहणे आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र ठेवण्याची त्यांची वृत्ती सर्वांनाच आपलीशी वाटत असे. ताईसाहेब कमलताई पाटील यांच्या निधनाने परिसराचा एक आधारवड हरपला असून त्यांच्या कार्याची आठवण समाजाच्या स्मरणात कायम राहील.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच समाजबांधव, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर विद्याविहार येथील त्यांच्या राहत्या घरी धाव घेत श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. त्यांच्या जाण्याने सातपुडा परिसराने मोठे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.



