नवापूरच्या खडकीपाड्यात टोळक्याचा राडा; हळदीच्या कार्यक्रमात वेडेवाकडे नाचले, महिलेला धक्काही मारला, जाब विचारताच वधूच्या आईवर तुटून पडत केली मारहाण
विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : लग्नात वेडेवाकडे नाचणार्या टोळक्यापैकी एकाचा महिलेला पाय लागल्यानंतर त्याचा जाब विचारल्यावर त्या टोळीतील आठ जणांसह इतरांनी साक्षीदार असलेल्या वधुच्या आईला तुंबळ मारहाण केल्याची धक्कादायक घटना नवापूर तालुक्यातील खडकीपाडा येथे घडली. या प्रकरणी वधुच्या आईच्या तक्रारीवरून आठ जणांवर विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीपाडा ता. नवापूर, जि. नंदुरबार येथील आशाबाई राजाराम चव्हाण (४८) या शेतमजुरी करून गुजराण करतात. ९ मार्च रोजी त्यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त गावातच तिच्या हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हितेश किरण गावित, योशेब जयसिंग गावित, विराट सोनू गावित, हितेश कुंतलकुमार गावित, हर्षल गोट्या गावित, जयेश ओज्या गावित, दिप्तेश कुंतलकुमार गावित व करण महेंद्र गावित (सर्व रा. खडकीपाडा, ता. नवापूर) हे या कार्यक्रमात वेडेवाकडा नाच करीत होते. याच दरम्यान योशेब याचा त्या ठिकाणी नाच करणार्या अमिताबाई अंबिलाल गावित या महिलेस पाय लागला. यावर अमिताबाईंनी योशेबला हळू व व्यवस्थित नाच करण्याची सूचना केली.
फिर्यादी आशाबाई या घटनेच्या साक्षीदार होत्या. योशेबने अमिताबाईंच्या जाब विचारण्याच्या रागातून तेथे उपस्थित इतर सात जण व इतर संशयित आरोपींना जमा करून फिर्यादी आशाबाईंना लाथाबुक्क्यांनी पाठीवर व गालावर जोरदार प्रहार करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. यावरून वरील सर्व संशयित आरोपींसह इतरांवर गैरकायद्याची मंडळी गोळा करून हाणामारी करण्यासह जिल्हाधिकार्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आशाबाई चव्हाण यांच्या तक्रारीवरून विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बिद्या पाडवी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



