गुन्हे वार्ता

नंदुरबारमध्‍ये गॅसचा काळाबाजार तेजीत; अवैध रिफिलिंग जोमात, गरजूंना मिळेना सिलिंडर, पण वाहनांसाठी गॅस सहज उपलब्‍ध, हॉटेलातही घरगुती गॅसचा वापर

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : युद्धामुळे निर्माण परिस्‍थितीचा गैरफायदा घेत नंदुरबार शहर आणि जिल्‍ह्यात घरगुती गॅसच्या काळाबाजाराचा धंदा तेजीत सुरू झाल्‍याचे चित्र समोर आले आहे. एकीकडे खर्‍या गरजू ग्राहकांना घरगुती गॅसचे सिलिंडर मिळणे दुरापास्‍त झालेले असतानाच जिल्‍हाभरात अवैध गॅस रिफिलिंगच्‍या धंद्याने उचल खाल्‍ली आहे. वाहनांमध्‍येही घरगुती गॅस सहज उपलब्‍ध होत असून, या सार्‍या परिस्‍थितीवर प्रशासनाकडून मात्र ‘अळीमिळी गुपचिळी’चे धोरण अंगिकारून कारवाई करीत नसल्‍याने लोकांकडून संताप व्‍यक्‍त होऊ लागला आहे.
युद्धाच्‍या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा तुटवडा असल्‍याच्‍या अफवा पसरविण्‍यात येत आहेत. या पाठीमागे परिस्‍थितीचा गैरफायदा घेऊन काही मंडळी गॅसशी संबंधित काळ्‍या धंद्यांना हवा देत असल्‍याचे चित्र नंदुरबार शशहर व जिल्‍ह्यात दिसत आहे. विशेषत: नंदुरबार शहरात काही ठिकाणी अवैध गॅस रिफिलिंगच्‍या धंद्याने जोर धरला आहे. यात धुळे रोड, बसस्‍थानक परिसर, शास्री मार्केट, निझर रोड यासह इतर परिसरांचा समावेश असल्‍याचे सांगण्‍यात येते. या ठिकाणी घरगुती तसेच व्‍यावसायिक गॅस सिलिंडरमध्‍ये १ ते १० किलोपर्यंत गॅस सहज भरून दिला जात आहे. एवढेच नाही तर रिक्षा, व्‍हॅनसारख्‍या वाहनांमध्‍येही गॅस भरून दिला जात आहे. अशा अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई करावी, अशी मागणी स्‍थानिकांकडून केली जात आहे.
हॉटेलातही घरगुती गॅस सिलिंडरचा वापर
दुसरीकडे, सरकारने हॉटेलांसाठी व्‍यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर देणे बंद केल्‍यानंतर काही हॉटेल तसेच खाद्यपदार्थ विक्रीच्‍या गाड्यांवर सर्रास घरगुती गॅस सिलिंडरचा वापर सुरू झाल्‍याचे चित्र आहे. नोंदणी केलेले घरगुती गॅसचे सिलिंडर तसेच अवैध रिफिलिंग सेंटरवरून सिलिंडर भरून आणून त्‍याचा वापर व्‍यवसायासाठी केला जात असल्‍याचे सांगण्‍यात येते.
प्रशासन कारवाई कधी करणार
नंदुरबार शहर व जिल्‍ह्यात गॅसशी संबंधित अवैध धंद्यांनी उचल खाल्‍ली असली तरी प्रशासनाचे त्‍याकडे लक्ष कसे जात नाही, असा सवाल आता जनतेकडून केला जावू लागला आहे. अवैध रिफिलिंग सेंटरवर कारवाईसह घरगुती गॅस ग्राहकांच्‍या सेवांवर डल्‍ला मारणार्‍या हॉटेलांची तपासणी करावी, वाहनांना अवैधरित्‍या मिळणार्‍या गॅसचा पुरवठा थांबवावा, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button