गुन्हे वार्ता

नवापूर एमआयडीसीत बनावट तुपाच्या कारखान्यावर छापा; १.४६ कोटींचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची मोठी कारवाई

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा)

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत नवापूर एमआयडीसी परिसरातील बनावट तुप तयार करणाऱ्या कारखान्याचा भंडाफोड केला आहे. कोणतीही शासकीय परवानगी नसताना हा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवापूर एमआयडीसी परिसरात छापा टाकला असता त्या ठिकाणी पामतेल, वनस्पती तूप, विविध रासायनिक पदार्थ तसेच फ्लेवरचा वापर करून गायीच्या तुपासारखा रंग आणि वास तयार करून बनावट तुप तयार केले जात असल्याचे आढळून आले.

या कारखान्यातून तुप तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, मशीनरी, गॅस सिलेंडर तसेच इतर सामग्री असा एकूण सुमारे १ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हे बनावट तुप “ओरीया काऊ घी”, “शुभ प्रिमियम काऊ घी”, “लाभ काऊ घी” आणि “राधा कृष्ण काऊ घी” या नावाने पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे.

छाप्यावेळी राकेशभाई ईश्वरभाई भरतीया (रा. सुरत, गुजरात) हा व्यक्ती घटनास्थळी आढळून आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित कारखान्याचा नेमका मालक कोण आहे आणि या बनावट तुपाच्या व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button