गुन्हे वार्ता

चोरट्यांचा मार्च एंड जोमात : नंदुरबार तालुक्‍याच्‍या खोक्राळी शिवारातून शेतीपंप तर मोलगीतून दुचाकी केली लंपास

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शेतीचा हंगाम सुरू होताच जिल्‍हाभर शेतीपंप आणि त्‍याच्‍याशी संबंधित साहित्‍याची चोरी करणार्‍या टोळ्‍या सक्रीय झाल्‍या असून, जिल्‍हाभरात वेगवेगळ्‍या ठिकाणांहून शेतीविषयक साहित्‍य चोरीच्‍या घटना उघडकीस येत आहेत. आता अशीच एक घटना नंदुरबार तालुक्‍यातील खोक्राळेत घडली असून, येथे चोरट्यांनी समाज कल्‍याण विभागातील कर्मचार्‍याच्‍या शेतात घुसखोरी करीत शेतीपंप, केबल व पाईप चोरून नेले. त्‍याचवेळी चोरट्यांनी अक्‍कलकुवा तालुक्‍याच्‍या मोलगी गावातून एक दुचाकीही लंपास केल्‍याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नंदुरबारच्‍या समाज कल्‍याण विभागातील कर्मचारी विजयसिंग नवलसिंग गिरासे (रा. खोक्राळे, ता. नंदुरबार, हल्‍ली मुक्‍काम बन्‍सीलाल नगर, नंदुरबार) यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार गिरासे यांचे खोक्राळे शिवारात गट नं. ९९/१ मध्‍ये शेत आहे. या शेतात विहिरीवर शेतीपंप बसवलेला असून, ९ मार्चला संध्‍याकाळी ५.३० ते १० मार्चच्‍या सकाळी १० वाजेच्‍या दरम्‍यान अंधाराचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्‍यांच्‍या शेतातून ७.५ एचपी पॉवरची पाण्‍याची मोटार, काळ्‍या रंगाचा ६०० फुट पाईप तसेच ७०० फुट वायर असा सुमारे २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी विजयसिंग गिरासे यांच्‍या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्‍या विरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक दिनेश भदाने यांच्‍या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोज विसपुते तपास करीत आहेत.
दरम्‍यान, याआधी शहादासह अन्‍य तालुक्‍यांत शेतीपंप, केबल व पाईपच्‍या चोरीच्‍या अनेक घटना उघडकीस आल्‍या होत्‍या. त्‍याला काही दिवस उलटत नाही तोच तशाच स्‍वरूपाच्‍या चोरीची घटना नंदुरबार तालुक्‍यातही उघडकीस आल्‍याने शेतकरी धास्‍तावले आहेत.
मोलगीतून दुचाकी लांबवली
अन्‍य एका घटनेत अक्‍कलकुवा तालुक्‍याच्‍या मोलगी पोलिस ठाणे हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी एका शेतकर्‍याची दुचाकी लंपास केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. सुधीर मगनभाई वसावा (२४, रा. झाक, डुबडाफळी, ता. डेडियापाडा जि. नर्मदा, गुजरात) या शेतकर्‍याने कामानिमित्त महाराष्‍ट्रात आल्‍यानंतर मोलगी येथील लकी किराणा दुकानाच्‍या बाजूला सार्वजनिक ठिकाणी आपली मोटारसायकल (जीजे २२ एन ८१६५) उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी गाडीजवळ कुणीही नसल्‍याचे पाहून ती चोरून नेली. या प्रकरणी सुधीर वसावा याच्‍या तक्रारीवरून मोलगी पोलिस ठाण्‍यात १२ मार्चला गुन्‍हा नोंदविण्‍यात आला असून, तपास पोलिस हेडकॉनस्‍टेबल किरण धनगर करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button