महिलांच्या हक्कासाठी संघटनांचा पुढाकार; उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन म्हणाल्या, महिलांना कृषी योजनांचा थेट लाभ मिळवून द्या
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यातील महिला शेतकर्यांची स्वतंत्र नोंदणी करून त्यांना कृषी योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी आता नंदुरबारमधील महिलांच्या संघटनांनीच पुढाकार घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महिलांच्या उपजीविका, सन्मान आणि हक्काशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशा मागण्या यावेळी महिलांच्या संघटनांनी केल्या.
महिला किसान अधिकार मंच, जनार्थ आदिवासी विकास संस्था, शेतकरी, उसतोड व इतर असंघटित महिला कामगार मंच यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील एकल महिला प्रतिनिधी यांच्या वतीने महिलांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांची भेट घेऊन त्यांना तीन निवेदने सादर करण्यात आली.
या आहेत मागण्या…
महिला शेतकर्यांची स्वतंत्र नोंदणी करून त्यांना अधिकृत ओळख मिळवून द्यावी, शासकीय कृषी योजनांचा लाभ थेट महिला शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा, एकल महिलांच्या प्रश्नांवर जिल्हा स्तरावर विशेष बैठक आयोजित करण्यात यावी, संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात एकल महिलांचे गावनिहाय सर्वेक्षण करण्यात यावे, महिलांच्या उपजीविका, सन्मान आणि अधिकाराशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशा मागण्या या संघटनांनी निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकार्यांकडे केल्या.
या महिला होत्या उपस्थित…
निवेदन सादर करताना रंजना कान्हेरे, निशा तांबे, वंदना सामुद्रे, भारती वळवी, भारती चौधरी यांच्यासह घोगळगाव, आष्टे, टोकरतलाव, लोणखेडा, सुंदरदे, धानोरा, केसरपाडा या भागातील एकल महिलांच्या प्रतिनिधी तसेच शेतमजूर महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



