नंदुरबार जिल्हा

अक्‍कलकुवा तालुक्‍यात बिबट्याचा हल्‍लाबोल; शेतकर्‍याच्‍या सहा शेळ्‍या केल्‍या फस्‍त, दोन शेळ्‍याही पळवल्‍या

अक्‍कलकुवा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नरभक्षक बिबट्याने अक्‍कलकुवा तालुक्‍यातील वडफळी नाला येथे एका शेतकर्‍याच्‍या शेतात घुसखोरी करीत तारांच्‍या कुंपणात बांधून ठेवलेल्‍या शेळ्‍यांवर हल्‍लाबोल केल्‍याची घटना उघडकीस आल्‍याने खळबळ उडाली आहे. यावेळी बिबट्याने सहा शेळ्‍या फस्‍त करतानाच दोन शेळ्‍याही सोबत नेल्‍याचे समोर आले असून, यामुळे पाळीव प्राणी जतन करणार्‍या शेतकर्‍यांमध्‍ये दहशत निर्माण झाली आहे.
अरविंद शामराव वळवी यांचे वडफळी नाला शिवारात शेत असून, याच शेतातील घराजवळ आंब्‍याच्‍या झाडाखाली लोखंडी तारांचे कुंपण उभारून शेळ्‍यांची सोय केली आहे. या ठिकाणी त्‍यांनी १५ शेळ्‍या बांधून ठेवल्‍या होत्‍या. या भागात वावर असलेल्‍या नरभक्षक बिबट्याने गुरुवारी रात्री या शेतात घुसखोरी करीत तेथे बांधलेल्‍या शेळ्‍यांना लक्ष्‍य केले. यावेळी बिबट्याने १५ पैकी ६ शेळ्‍या जागेवरच अर्धवट खाऊन मारून टाकल्‍या. पण एवढ्यावरच न थांबता बिबट्याने दोन शेळ्‍या नाश्‍ता म्‍हणून सोबतही नेल्‍या.
ही घटना घडली त्‍यावेळी शेळ्‍यांचे मालक अरविंद वळवी गावात गेलेले होते. सकाळी ते शेतात परतल्‍यानंतर त्‍यांच्‍या नजरेस ही घटना पडली. त्‍यांनी तत्‍काळ शेजार्‍यांना घटनेची माहिती दिली. त्‍यानंतर वनविभागालाही घटनेची माहिती देण्‍यात आली. दरम्‍यान, परिसरात वावर असलेल्‍या बिबट्याने थेट पाळीव प्राण्‍यांना लक्ष्‍य करणे सुरू केल्‍याने शेतकरी धास्‍तावले असून, नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्‍त करण्‍याची मागणी वनविभागाकडे करण्‍यात येत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button