मुख्य बातम्या

‍सावधान : वीजबिलाचा चेक बाऊन्‍स झाल्‍यास दोन वर्षे होईल जेल अन्‌ फोडावी लागेल खडी!; नंदुरबारकरांचे ६७ लाखांचे चेक झाले आहेत बाऊन्‍स

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : वीजबिल थकल्‍यावर होणारी कारवाई टाळण्‍यासाठी किंवा वेळ मारून नेण्‍यासाठी अनेकदा ग्राहकांकडून महावितरण कंपनीला थकलेल्‍या रकमेच्‍या बिलापोटी धनादेश दिला जातो. मात्र, पुढे हे धनादेश वटतच नसल्‍याने अडचणी निर्माण होतात. मात्र, आता असे धनादेश न वटविणार्‍या (चेक बाऊन्‍स) ग्राहकांवर महावितरणची वक्रदृष्‍टी पडली आहे. कारण अशा ग्राहकांवर आता महावितरण थेट फौजदारी गुन्‍हा दाखल करणार असून, तसे होऊन गुन्‍हा सिद्ध झाल्‍यास संबंधित ग्राहकाला दोन वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा होऊ शकणार आहे.
वीज बिलाचा चेक बाऊन्‍स करणार्‍या ग्राहकांबाबत महावितरण कंपनीने घेतलेल्‍या या कडक पवित्र्यामुळे ग्राहकांना आता केवळ प्रशासकीय कारवाईच नव्‍हे तर कायदेशीर दणकाही सहन करावा लागणार आहे. यामुळे अशा ग्राहकांच्‍या धास्‍तीत वाढ झाली आहे. महावितरणकडून देण्‍यात आलेल्‍या माहितीनुसार, एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या ११ महिन्‍यांच्‍या कालावधीत एकट्या जळगाव परिमंडळात वीज ग्राहकांनी २ कोटी ९४ लाख ६९ हजार ४२३ रुपयांच्‍या रकमेचे धनादेश दिले होते. त्‍यातील १,९४४ धनादेश वटलेच नाहीत. यामध्‍ये एकट्या नंदुरबार जिल्‍ह्यातील ६७ लाख २१ हजार ६३४ रुपयांच्‍या न वटलेल्‍या ४१९ धनादेशांचा समावेश आहे. आता या ग्राहकांच्‍या बाबतीत महावितरण पुढील निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button