रिक्षांवर कारवाई करताच शिवसेनेचा संताप; जिल्हाप्रमुख ॲड. रघुवंशींची ‘आरटीओ’ कार्यालयात धडक; रिक्षाचालकांनाही म्हणाले, नियम तोडू नका

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षांमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरून वाहतूक करणाऱ्या ५० रिक्षा उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्तीची कारवाई केल्याने शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. या कारवाईनंतर रिक्षा चालकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्याकडे धाव घेताच रघुवंशी यांनी तत्काळ आरटीओ कार्यालय गाठत अधिकाऱ्यांशी चर्चा करीत चालकांना दिलासा देण्याची मागणी केली. दुसरीकडे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षाचालकांवर आकसापोटी कारवाई न करण्याचे आदेश ‘आरटीओ’ विभागाला दिल्याचे शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी कळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपप्रादेशिक परिवहन विभागाने अवैध गॅस वापरणाऱ्या रिक्षांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली होती. या कारवाईत सुमारे ५० रिक्षा जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आल्याने परिवहन कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
रोजगाराचा प्रश्न आणि माणुसकीची साद
रिक्षा चालकांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव व इतर निरीक्षकांसोबत बैठक घेतली. “जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने अनेक तरुण रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा कडक कारवाईमुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टिकोनातून दंड कमी करून रिक्षा सोडण्यात याव्यात,” अशी भूमिका रघुवंशी यांनी मांडली.
रिक्षाचालकांना कायद्याचे पालन करण्याचा सल्ला
यावेळी ख ॲड. रघुवंशी यांनी रिक्षा चालकांनाही खडे बोल सुनावले. “गॅस भरून रिक्षा चालवणे कायद्याने गुन्हा असून, यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. स्वतःच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरटीओच्या नियमांचे पालन करा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या रिक्षात अवैधरित्या गॅस भरून रस्त्यावर धावणार्या रिक्षाचालकांची कानउघाडणी केली. या शिष्टमंडळात नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेवक पप्पू गिरासे, रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी किरण गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते.
आकसापोटी कारवाई नको : सरनाईक
दुसरीकडे, यानंतर काही वेळातच शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनीही या मुद्द्यावर राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा केली. यावेळी सरनाईक यांनी आरटीओ कार्यालयाने आकसभावनेतून रिक्षा चालकांवर कारवाई करू नये, असे आदेश दिल्याची माहिती आ. रघुवंशी यांनी दिली. नंदुरबार शहरात रिक्षा चालकांवर कारवाई झाल्यानंतर त्यांच्या शिष्टमंडळाने आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे कैफियत मांडली. त्यानंतर आ. रघुवंशींनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत रिक्षा चालकांवर झालेल्या कारवाईची माहिती दिली. मंत्री सरनाईक यांनी देखील परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना रिक्षा चालकांवर कुठल्याही आकसापोटी कारवाई न करण्याच्या सूचना केल्या, असे आ. रघुवंशी यांच्या कार्यालयाने कळवले आहे.



