सकाळी तळोदात सापडले बिबट्याचे पिलू, रात्री शहाद्यात घुसला तरस; शहरात दिले दर्शन, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तळोदा तालुक्यात बिबट्याचे पिलू सापडून २४ तास उलटत नाही तोच आता शहादामध्ये तरसाने दर्शन दिल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहादाच्या एनआरआरई विला परिसरात बुधवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास तरस हा वन्य प्राणी फिरताना दिसला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआरआरई विला क्रमांक २ येथील रहिवासी द्वारकेश शांतीलाल साळी यांनी विला क्रमांक २ व ३ च्या मागील भागात एक तरस फिरताना पाहिला. त्यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांना याची माहिती दिली. नागरिकांनी एकत्र येत आवाज करून त्या तरसाला परिसरातून पळवून लावले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास नागरिक घाबरत आहेत. या भागात लहान मुले व पाळीव जनावरे असल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी वन विभागाने तात्काळ लक्ष घालून तरसाला पकडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले असून परिसरात गस्त वाढविण्याची मागणीही करण्यात येत आहे.
दरम्यान, वनविभागातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरस हा प्राणी माणसापासून दूर पळत असला तरी तो मृत प्राण्यांचे हाडे खाण्यासाठी ओळखला जातो. मात्र, रेबिज आजार झालेला असेल तर तरस माणसांवरही हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाही.



