नंदुरबार जिल्हा

उसाच्‍या ट्रॅक्‍टरने घेतला तळोदा तालुक्‍यातील दुचाकीस्‍वार तरुणाचा बळी; उपचार सुरू असताना मृत्‍यू; छोटा-मोठ्या सोनावलदरम्‍यान घडली होती दुर्घटना

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : साडेतीन महिन्‍यांपूर्वी उसाने भरलेल्‍या ट्रॅक्‍टरच्‍या जोरदार धडकेत गंभीर जखमी झालेल्‍या तळोदा तालुक्‍यातील एकधड येथील २३ वर्षीय तरुणाचा अखेर गुजरातमध्‍ये रुग्‍णालयात उपचार सुरू असताना अखेर मृत्‍यू झाला. यानंतर मयत तरुणाच्‍या वडिलांच्‍या फिर्यादीवरून संबंधित ट्रॅक्‍टरच्‍या अज्ञात चालकाविरोधात तळोदा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ३० नोव्‍हेंबर २०२५ रोजी हर्षल गुलाबसिंग नाईक (२३, रा. एकधड, ता. तळोदा, जि. नंदुरबार) हा तरुण दुचाकीवरून (क्र. एमएच ४८ सीजे ७६३७) धानोरा येथून आपल्‍या गावी परतत होता. त्‍याचवेळी संध्‍याकाळी ७ ते ७.३० वाजेच्‍या दरम्‍यान छोटा सोनावल व मोठा सोनावल दरम्‍यान विटभट्टीजवळ त्‍याच्‍या दुचाकीला समोरून भरधाव येणार्‍या उसाने भरलेल्‍या ट्रॅक्‍टरने (क्र. एमएच ३९ एफ ०४६७) ने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्‍यात हर्षल रस्‍त्‍यावर फेकला जावून त्‍याचे डोके, डावा पाय, डाव्‍या हाताचे मनगट, पोट, डोळे यांना गंभीर जखमा झाल्‍या होत्‍या. मात्र, ट्रॅक्‍टरचालक गंभीर जखमी हर्षलला मदत करण्‍याऐवजी अपघातस्‍थळावरून पळून गेला.
दरम्‍यान, अपघाताची माहिती मिळाल्‍यानंतर हर्षला प्रारंभी स्‍थानिक रुग्‍णालयात हलविण्‍यात आले होते. तेथे उपचार केल्‍यानंतर प्रकृती गंभीर असल्‍याने त्‍याला सुरत येथील नवीन जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयात अधिक उपचारांसाठी हलविण्‍यात आले होते. तेथे सुरूवातीला उपचार प्रतिसाद दिल्‍यानंतर मात्र त्‍याची प्रकृती आणखीच बिघडली आणि त्‍यातच २ फेब्रुवारी २०२६ रोजी ३.३० वाजेच्‍या सुमारास त्‍याची प्राणज्‍योत मालवली.
या रुग्‍णालयातून कागदपत्रे प्राप्‍त झाल्‍यानंतर हर्षलचे वडिल गुलाबसिंग दामजी नाईक (५६, शिक्षक रा. एकधड, ता. तळोदा, जि. नंदुरबार, हल्‍ली मुक्‍काम रुम नं.२०३, मनोर सनसिटी कॉम्‍प्‍लेक्‍स, पालघर, जि. पालघर) यांनी बुधवारी (दि.११ मार्च) सायंकाळी तळोदा पोलिस ठाणे गाठून रितसर फिर्याद दाखल केली. त्‍यावरून संबंधित ट्रॅक्‍टरच्‍या अज्ञात चालकाविरोधात गुन्‍ह्याची नोंद करण्‍यात आली. तळोदा पोलिस ठाण्‍याचे पोलिस निरीक्षक राजन मोरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्‍स्‍टेबल रामा वळवी हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button