गुन्हे वार्ता

नंदुरबारमध्‍ये दुचाकीचोरांची टोळी गजाआड, १८ दुचाकी ताब्‍यात, शहर गुन्‍हे शोध शाखेची जबरदस्‍त कामगिरी, यात तुमची दुचाकी तर नाही ना…

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहर पोलिस ठाण्‍याच्‍या गुन्‍हे शोध पथक शाखेने जबरदस्‍त कामगिरी करीत दुचाकीचोरांच्‍या तिघांच्‍या टोळीच्‍या मुसक्‍या आवळण्‍यात यश मिळविले आहे. या तिघांकडून तब्‍बल १८ मोटारसायकली जप्‍त करण्‍यात पोलिसांना यश आले असून, यात दोन सख्‍ख्‍या भावांचा समावेश आहे.
१४ फेब्रुवारीला शहर पोलिसांच्‍या गुन्‍हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना नंदुरबार शहरातील शास्‍त्रीनगर भागात एक जण काळ्‍या रंगाची शाईन मोटारसायकल संशयास्‍पदरित्‍या घेऊन फिरताना आढळला होता. पोलिसांनी त्‍याला अडवल्‍यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्‍याने पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेऊन चौकशी केल्‍यावर तो दुचाकीचोर असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. रवींद्र आबा धनगर (रा. अक्राळे, पोस्‍ट रनाळे, ता. व जि. नंदुरबार) असे त्‍याचे नाव असल्‍याचे त्‍याने सांगितले होते.
पोलिसांनी सखोल चौकशी केल्‍यानंतर त्‍याने समाधान पंडित कोळी (२३) व सागर पंडित कोळी (२६, दोघेही रा. आरावे, ता. शिंदखेडा, जि. नंदुरबार) या दोन भावांसोबत नंदुरबारसह धुळे, गुजरात व मध्‍यप्रदेशातून वेगवेगळ्‍या ठिकाणाहून अनेक मोटारसायकलींची चोरी केल्‍याचे कबुल केले.
पोलिसांनी या तिघांनाही ताब्‍यात घेतले असून, त्‍यांच्‍याकडून तब्‍बल १८ दुचाकी ताब्‍यात घेण्‍यात आल्‍या आहेत. या तिघांवर महाराष्‍ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्‍या कलम १२४ नुसार नंदुरबार शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. दुचाकी चोरी झालेल्‍यांनी या तिघांकडून ताब्‍यात घेण्‍यात आलेल्‍या दुचाकींची ओळख पटवण्‍यासाठी नंदुरबार शहर पोलिस ठाण्‍याशी संपर्क करण्‍याचे आवाहन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी केले आहे.
यांनी केली यशस्‍वी कामगिरी
पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्‍या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलिस ठाण्‍याचे पोलिस निरीक्षक नीलेश देसले, गुन्‍हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक छगन चव्‍हाण, उपनिरीक्षक भुनेश मराठे, हेडकॉन्‍स्‍टेबल भटू धनगर, प्रशांत पाटील, पंकज महाले, विनोद जाधव, सुनिल वाकडे, पोलिस कॉन्‍स्‍टेबल राहुल पांढारकर, ललित गवळी, राहुल राठोड, विनोद महाजन, प्रवीण वसावे, विशाल मराठे, हरेश कोळी, विद्धेश्‍वर बिरारी, नरेंद्र पाडवी, किरण मोरे, महिला पोलिस कॉन्‍स्‍टेबल रोहिणी धनगर, निंबा वाघमोडे आदींच्‍या पथकाने ही यशस्‍वी कामगिरी केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button