नंदुरबार जिल्हा

नंदुरबारकरांना आता पासपोर्ट मिळणार फटाफट; कारण पोलिसांच्‍या हाती आली प्रक्रिया सुकर करणारी आधुनिक उपकरणे

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहर आणि जिल्‍ह्यातील परदेशी व्‍यवसाय, पर्यटनासाठी जावू इच्‍छिणार्‍यांना आता पारपत्र (पासपोर्ट) मिळविणे अधिक सोपे होणार आहे. कारण यासाठीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होऊन जनतेची किचकटपणातून सुटका करण्‍याच्‍या हेतूने जिल्‍हा पोलिसांच्‍या हाती अत्‍याधुनिक टॅब आणि संगणक देण्‍यात आले असून, जिल्‍हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्‍या हस्‍ते पोलिस ठाण्‍यांना या उपकरणांचे वाटप करण्‍यात आले.
पोलिसांकडे अत्‍याधुनिक उपकरणांची उपलब्‍धता नसल्‍याने नंदुरबार जिल्‍ह्यात पासपोर्टसाठी अर्ज करणार्‍यांना पासपोर्ट मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून घेण्‍यासाठी अनेक दिवसांच्‍या कालावधीची प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र, पोलिसांच्‍या गोपनीय आणि विशेष शाखांकडे अत्‍याधुनिक उपकरणांचा असलेला अभाव हे यामागील महत्त्‍वाचे कारण ठरत होते. जनतेची मदत करण्‍याची इच्‍छा असूनही अत्‍याधुनिक उपकरणांच्‍या अभावी पोलिसांचे हात बांधलेले असायचे. पोलिसांची हीच अडचण ओळखून आणि त्‍यामुळे जनतेचा होणारा खोळंबा पाहून अखेर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी आपल्‍या सहकार्‍यांना या कामासाठी अत्‍याधुनिक उपकरणे मिळवून देण्‍यासाठी पुढाकार घेतला. त्‍याला यश आले असून, सरकारने नंदुरबार पोलिस ठाण्‍यांसाठी १३ सॅमसंग गॅलक्‍सी एस– १०  एफइ ५ जी टॅब आणि डेल कंपनीचे १३ संगणक मंजूर केली आहेत. या सर्व उपकरणांचे वाटप मंगळवारी पोलिस अधीक्षकांच्‍या हस्‍ते जिल्‍ह्यातील १२ पोलिस ठाण्‍यातील गुन्‍हे शाखा आणि जिल्‍हा विशेष शाखेला वाटप करण्‍यात आले. यावेळी जिल्‍हा विशेष शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विश्‍वास पावरा यांच्‍यासह सर्व पोलिस ठाण्‍यांचे पारपत्र पडताळणीचे कामकाज पाहणारे पोलिस अंमलदार उपस्‍थित होते.
ही अत्‍याधुनिक उपकरणे पोलिसांना उपलब्‍ध झाल्‍याने आता नंदुरबार जिल्‍ह्यातील पासपोर्ट पडताळणी आणि संबंधित कामकाज अधिक वेगवान व कार्यक्षम पद्धतीने पार पडण्‍याची अपेक्षा आहे. तसेच या नवीन उपकरणाच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्यातील पासपोर्ट काढू इच्‍छिणार्‍यांना पासपोर्ट पडताळणी, माहिती संकलन व ऑनलाईन प्रक्रिया अधिक सुलभ व अधिक जलद गतीने पूर्ण करून चांगली सेवा मिळण्‍यास मदत होईल, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी व्‍यक्‍त केला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button