गुन्हे वार्ता

अक्‍कलकुव्‍यात क्रिकेटचा चेंडू घरातील एसीला लागला, जाब विचारताच सहा जणांच्‍या टोळक्‍याने चढवला हल्‍ला, तिघे जखमी, सोन्‍याच्‍या अंगठीसह रोकडही लांबवली

अक्कलकुवा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : क्रिकेट खेळताना टोलवलेला चेंडू घरातील एसीच्‍या पंख्‍याला लागल्‍याचा जाब विचारणार्‍या कुटुंबावर टोळक्‍याने सळईने हल्‍ला चढवल्‍याची खळबळजनक घटना अक्‍कलकुवा शहरातील मक्राणीफळी भागात घडली. या घटनेत एका महिलेसह तिघे जण जखमी झाले असून, सहा जणांविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
या प्रकरणी शबाना रफिक काझी यांनी अक्‍कलकुवा पोलिस ठाण्‍यात फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्‍हणजे यावेळी संशयित हल्‍लेखोरांनी महिलेच्‍या बोटातील सोन्‍याची अंगठी तसेच पती व मुलाच्‍या खिशातून २७ हजार ५०० रुपयांची रक्‍कमही लांबवल्‍याचे शबाना काझी यांनी फिर्यादीत म्‍हटले आहे.
शुक्रवारी (दि. ६) शबाना काझी घरात काम करीत असताना परिसरात काही मुले क्रिकेट खेळत होते. यापैकी रफिक तमोयोद्दीन शेख यांच्‍या मुलाने टोलवलेला चेंडू काझी यांच्‍या घरातील एसीच्‍या पंख्‍याला लागून तो एसी बंद पडला. यावेळी संतापलेल्‍या काझी यांनी या मुलांना जाब विचारीत त्‍यांना थोडे लांब जावून खेळा, असा सल्‍ला दिला. ही बाब त्‍या मुलांनी घरी जावून आपल्‍या कुटुंबियांना सांगितली. यानंतर रफिक शेख व त्‍यांच्‍या सहकार्‍यांनी थेट काझी यांचे घर गाठून त्‍यांच्‍याशी वाद घालण्‍यास सुरूवात केली. या वादात शबाना यांचे पती व मुलाने मध्‍यस्‍थी करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, रफिक व त्‍यांच्‍या सहकार्‍यांनी काहीही ऐकूण न घेता थेट काझी कुटुंबातील तिघांनाही सळईने मारहाण सुरू केली. यात हे तिघेही जखमी झाले.
या प्रकरणी रफिक तमोयोद्दीन शेख, आसिफ युसूफ मक्राणी, सलीम झहीर मक्राणी, वसीम तमीज शेख, समीना वसीम मक्राणी, समीर मक्राणी या सहा जणांविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button