शहाद्याच्या लोणखेडात होईना ग्रामसभा; दीड महिना उलटला तरी कुणाला वेळच मिळेना, गावकरी संतापले, ‘बीडीओं’ना म्हणाले, तुम्हीच ग्रामसभा घ्या
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातील लोणखेडा गावात २६ जानेवारीनंतर दीड महिना उलटला तरी ग्रामसभाच न झाल्याने गावकरी संतापले आहेत. विशेष म्हणजे या संदर्भात कुणीही पुढाकार घ्यायला तयार नाही आणि प्रशासनाकडून कुणावर कारवाईही न झाल्याने गावकर्यांचा संताप वाढत चालला आहे. गावकर्यांनी आता पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना निवेदन देऊन आता तुमच्या अध्यक्षतेखालीच ग्रामसभा घ्या, अशी मागणी केली आहे.
शासकीय नियमानुसार, २६ जानेवारी रोजी लोणखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणे आवश्यक होते. मात्र, काही कारणामुळे त्या दिवशी ती होऊच शकली नव्हती. कदाचित पुढे ही सभा होईल अशी गावकर्यांना अपेक्षा होती. मात्र, काहीच हालचाली नसल्याने अखेर त्यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकार्यांकडे चौकशी केली. परंतु, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर गावकर्यांनी पंचायत समिती गाठून निवेदन देत ‘आता तुम्हीच येऊन ग्रामसभा घ्या’ अशी गळ निवदेनाद्वारे गटविकास अधिकार्यांना घातली.
प्रजासत्ताक दिनी होणारी ग्रामसभा गावकर्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसयर प्रत्येक आर्थिक वर्षात चार ग्रामसभा घेणे प्रत्येक ग्रामपंचायतींना बंधनकारक आहे. असे असताना लोणखेडा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असून, यामुळे गावातील विकास कामे थांबली आहेत. शासकीय विकास योजनांच्या लाभार्थ्यांची निवडही रखडली आहेत. त्यामुळे ग्रामसभा न घेणार्यांवर कडक कारवाई करतानाच ही सभा त्वरित होईल, या दृष्टीने संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी गावकर्यांनी निवेदनात केली आहे. या निवेदनावर गणेशराजे पाटील, भुर्या ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य नरेश ठाकरे यांच्या इतरांच्या स्वाक्षर्या आहेत.



