नंदुरबार जिल्हा

धक्‍कादायक : ४० लाखांत खरेदी अन्‌ १६३ कोटी कमावण्‍याचा प्रयत्‍न; नवापुरातील गंगापूरच्‍या जमीन संपादन घोटाळ्‍याची व्‍याप्‍ती मोठी; एसआयटीचे नेतृत्त्‍व विभागीय आयुक्‍तांकडे

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : गंगापूर (ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथे जमीन संपादनात झालेल्‍या भ्रष्‍टाचार प्रकरणाची व्‍याप्‍ती फारच मोठी असल्‍याचे समोर आले आहे. एका व्‍यापार्‍याने एका शेतकर्‍याकडून अवघ्‍या ४० लाख रुपयांत खरेदी केलेल्‍या जमिनीचे महसूल अधिकार्‍यांशी हातमिळवणी करून तब्‍बल १६३ कोटी रुपये उकळण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याची धक्‍कादायक बाब आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेत उघडकीस आणली. दरम्‍यान, यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केल्‍याप्रमाणे या प्रकरणाच्‍या एसआयटीची स्‍थापना करण्‍यात आली असून, त्‍याचे नेतृत्त्‍व नाशिकचे विभागीय महसूल आयुक्‍त प्रवीण गेडाम यांच्‍याकडे सोपविण्‍यात आले आहे. गंगापूर येथे जमीन संपादनात झालेला भ्रष्‍टाचार आणि बक्षीसपत्राच्‍या आधारावर नियमांचे उल्‍लंघन करून झालेल्‍या फेरफाराचे प्रकरण आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेत उचलून धरले आहे. या विषयावर त्‍यांनी प्रश्‍न उपस्‍थित केला होता. त्‍यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्‍याची घोषणा केली होती.
यावेळी आ. रघुवंशी यांनी या प्रकरणात धक्‍कादायक माहिती सभागृहाला दिली होती. ते म्‍हणाले, नंदुरबार जिल्‍ह्यात महामार्गासाठी भूसंपादन सुरू आहे. यात गंगापूर येथे एका व्‍यापार्‍याने एका आदिवासी शेतकर्‍याची जमीन फक्‍त ४० ला/ख/ रुपयांत खरेदी केली. त्‍यानंतर महसूल विभागाच्‍या अधिकार्‍यांशी संगनमत साधून याच जमिनीच्‍या माध्‍यमातून तब्‍बल १६३ कोटी रुपये उकळण्‍याचा प्रयत्‍न केला. विशेष म्‍हणजे आदिवासींची जमीन कोणत्‍याही प्रकारचे बक्षीसपत्र तयार करून हस्‍तांतरीत करता येत नाही. तरीही या व्‍यापार्‍याने ही कमाल करून दाखवली.
भूसंपादन करताना या जमिनीचे मूल्‍य केवळ ४० लाख रुपये दाखवण्‍यात आले. मात्र नंतर व्‍यापार्‍याने उपविभागीय अधिकार्‍यांशी हातमिळवणी करून या जमिनीसाठी ८ कोटी रुपयांचे अवॉर्ड करून घेतले. त्‍याच्‍या अपिलात ते थेट १६३ कोटी रुपये झाले.
दरम्‍यान, आता प्रवीण गेडाम यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील एसआयटी या प्रकरणाची चौकशी करणार असून, या समितीत नाशिक महसूल विभागाचे अपर आयुक्‍त, राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी तसेच नगररचना व मूल्‍यनिर्धारण विभागाचे सहसंचालक हे सदस्‍य राहणार आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button