सावजाच्या शोधात शस्रांसह जंगलात फिरणारी तिघांची टोळी गजाआड; वनविभागाची नवापूर तालुक्यात धडाकेबाज कारवाई

विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अंधाराचा गैरफायदा घेत शस्रांसह जंगलात सावजाच्या शोधासाठी निघालेली टोळी वनविभागाच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या कर्मचार्यांनी जीव धोक्यात घालून नवापूर तालुक्याच्या वनविभागाने या धडाकेबाज कारवाईत तिघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, दारूगोळा आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
वनविभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल प्राशा पगार ९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पथकासह कंपार्टमेंट क्रमांक ८४ परिसरात गस्त घालत होत्या. याचदरम्यान जंगल परिसरात तीन इसम त्यांना दिसले. हालचाली संशयास्पद वाटल्याने वनअधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. यात त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे (बंदुका), बंदुकीसाठी वापरला जाणारा दारुगोळा, सऱ्हे तसेच एक मोटारसायकल आढळली. वनअधिकार्यांनी हे साहित्य जप्त केले.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे अशोक प्रशा गावीत (रा. चिचलीपाडा, ता. नवापूर, जि. नंदुरबार), रत्ना रेक्या भिल (रा. चरणमाळ, पो. उमरपाटा, ता. साक्री, जि. धुळे) आणि रोहित मकामजी पवार (रा. चरणमाळ, पो. उमरपाटा, ता. साक्री, जि. धुळे) अशी आहेत.
या प्रकरणी चिंचपाडा वनविभागात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास वनपाल कामोद करत आहेत. दरम्यान, १० मार्च रोजी तिन्ही संशयितांना आवश्यक कागदपत्रांसह प्रथमवर्ग न्यायालय, नवापूर येथे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १३ मार्चपर्यंत चार दिवसांची वनकोठडी सुनावली.
ही कारवाई धुळे प्रादेशिक वनसंरक्षक निनू सोमराज, नंदुरबार उपवनसंरक्षक संतोष सस्ते, धुळे विभागीय वनाधिकारी (दक्षता) राजेंद्र सदगीर तसेच नंदुरबार प्रादेशिक व वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वनपाल कामोद, एस.डी. बडगुजर, युवराज भाबड, वनरक्षक सतीश पदमर, दीनानाथ कोकणी, रामदास पावरा, इलान गावित, अमोल डी. गावित, देवमन सूर्यवंशी, शिवराम गावित, अनिल पावरा तसेच वनमजूर बाळा गावित, फिलिप गावित, कांतीलाल गावित, फिलिप सखाराम गावित आणि वाहन चालक चमाऱ्या गावित यांनी सहभाग घेतला.



