जेवणात रस्सा कमी वाढला म्हणून दोन गटांत तुंबळ हाणामारी; हल्ला-प्रतिहल्ल्यात तिघे जखमी, अक्कलकुवा तालुक्यातील मोठी घटना
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : होळी उत्सवानिमित्त प्रसादासाठी बनविलेलले जेवण वाढताना रस्सा लहान ग्लासात दिला म्हणून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना अक्कलकुवा तालुक्यातील उमरागव्हाण (ओरपापाडा) येथे घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून, एकूण आठ जणांविरोधात मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश रायसिंग वसावे (२९, रा. उमरागव्हाण, ओरपापाडा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, होळी उत्सवानिमित्त ९ मार्च उमरागव्हाण (ओरपापाडा) गावात प्रसादाचे जेवण बनवण्यात आले होते. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी फिर्यादी गावकर्यांना जेवण वाढत होता. त्यावेळी सागर गोवाल वसावे याने त्याच्याशी जेवणात रस्सा लहान ग्लासात दिला म्हणून वाद घातला. हा वाद वाढल्यानंतर सागरसह त्याचा भाऊ सौरभ गोवाल वसावे, वडिल गोवाल हुन्या वसावे तसेच अन्य एक अज्ञात संशयित आरोपी (सर्व रा. उमरगव्हाण ओरपापाडा) यांनी रमेश याच्यावर हल्ला चढवला. यात फिर्यादीला बांबूच्या काठीने, दगडाने पाठीवर, छातीवर व कपाळावर वार केले. यावेळी फिर्यादीची आई सोडवायला गेल्यावर तिलाही पाठीवर काठीने मारहाण करण्यात आली. रमेश वसावे याच्या तक्रारीवररून वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर सौरभ गोवाल वसावे (२१, रा. उमरागव्हाण, ओरपापाडा, ता. अक्कलकुवा) याने रमेश रायसिंग वसावे, कैलास बुलाखी वसावे, रायसिंग इद्या वसावे व अन्य एक अज्ञात आरोपी यांनी आपल्याला भावाला मारहाण का केली याचा जाब विचारल्याच्या रागातून मारहाणा केल्याची फिर्याद दाखल केली. यात आपल्याला काठीने व दगडाने पाठीवर, डाव्या हातावर, डाव्या खांद्यावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असे सौरभ याने फिर्यादीत म्हटले आहे. यावरून वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास अनुक्रमे पोलिस हेडकॉन्स्टेबल दिलीप चौरे व पितांबर जगदाळ हे करीत आहेत.



