शहादा नगर परिषदेचा ‘एबीसी’ प्रोग्राम; २९४ कोटींच्या अर्थसंकल्पात मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र तरतूद; पायाभूत सुविधा, स्वच्छतेवर विशेष भर

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा नगर परिषदेचा सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठीचा तब्बल २९४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला. शहरात मोकाट जनावरांमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येवर उपाय म्हणून ॲनिमल बर्थ कंट्रोल (ABC) कार्यक्रमासह मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी या अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. ही सभा नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा माधवी पाटील, सर्व विभागप्रमुख, नगरसेवक-नगरसेविका तसेच मुख्याधिकारी व लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अर्थसंकल्पात शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले असून, रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत विभागांचे उन्नतीकरण यावर मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महिला व बालकल्याण, दिव्यांग नागरिकांसाठी सुविधा वाढवणे यालाही विशेष महत्त्व देण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी दिली. यासोबतच कर वसुली सुधारणा, तसेच विविध शासकीय योजनांतून अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
शहरात मोकाट जनावरांचा वावर खूपच मोठ्या प्रमाणात वाढला असून, ही जनावरे खुलेआम रस्त्यावर फिरून दहशत माजवित आहेत. मागील आठवड्यात सराफ बाजारात मोकाट कुत्र्यांनी काही जणांवर हल्ला चढविला होता. यात एक दहा वर्षांची एक चिमुकली गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वी मंगळवारी आठवडी बाजारात मोकाट सांडांच्या झुंजीमुळे दहशत माजली होती. यामुळे शहरवासियांत नाराजी असून, या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने या मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताकडे यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे.
सभेदरम्यान काही सदस्यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींवर दुरुस्त्या सुचविल्या. त्या दुरुस्त्या ५ मार्चपर्यंत नगर परिषद सदस्यांकडून लेखी स्वरूपात घेऊन त्यांचा अंतर्भाव करून सुधारित अंदाजपत्रक जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, हा अर्थसंकल्प एकूणच शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा व नागरिकांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.



