अवैध दारू विकता का, विचारताच दारूबंदी पथकावर हल्ला; दोघांवर गुन्हा; शहादा तालुक्यातील घटना; नंतर ‘दारूबंदी’च्या दोघांविरोधात छेडछाडीचा गुन्हा

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अवैध दारू विक्रीची माहिती काढत एका घरात पोहोचलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (दारूबंदी) पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना शहादा तालुक्यातील जामवाडा येथे शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी जखमी झाले असून, या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याचवेळी उत्पादन शुल्क विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांवर घरात घुसून महिलेची छेड काढल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा तालुक्यातील जामवाडा येथे काही घरांत अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती नंदुरबारच्या उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानंतर या खात्याचे कर्मचारी साक्षीदारांसह शुक्रवारी सायंकाळी ५.३० ते ६ वाजेच्या दरम्यान या गावात पोहोचले. तेथे गेल्यानंतर या पथकाने रमेश ठोबा पावरा आणि छगन ठोबा पावरा यांच्या घरी पोहोचून तेथे अवैध दारू विक्री सुरू आहे का, याची माहिती घेत होते. याचवेळी रमेश व छगन यांच्यासह आणखी दोघांनी पथकातील फिर्यादी राजेंद्र नारसिंग पावरा यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना शिवीगाळ करीत हाताबुक्क्यांनी तसेच लाठ्याकाठ्यांनी मारहाण सुरू केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे या कर्मचाऱ्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. नंतर राजेंद्र नारसिंग पावरा यांनी शहादा पोलीस ठाणे गाठून रीतसर फिर्याद नोंदवली. त्यावरून रमेश ठोबा पावरा आणि छगन ठोबा पावरा (दोघेही रा. जामवाडा, ता. शहादा, जि. नंदुरबार) यांच्यासह आणखी दोघांवर (नावे माहित नाहीत) यांच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक संदीप वाघ हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
‘दारूबंदी’च्या दोघांवर छेडछाडीचा गुन्हा
याचवेळी जामवाडा, ता. शहादा येथील एका महिलेने उत्पादन शुल्क विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात छेड काढून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची फिर्याद दाखल केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे दोन कर्मचारी (नावे माहिती नाहीत) शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आपल्या घरी आले होते. त्यांनी ‘दारू विकता का’ अशी चौकशी केल्यावर माझ्यासह कुटुंबीयांनी नाही असे उत्तर दिल्यावर हे कर्मचारी थेट घरात घुसले. त्यांनी घरात दारूचा शोध सुरू केला. याच दरम्यान दारू न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांपैकी एकाने माझा हात धरून छेड काढून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. यामुळे आपण घरातून पळण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत तोल जाऊन पडल्याने डाव्या कानाजवळ दुखापत झाली. यावेळी आपण आरडाओरड केल्याने घराच्या आसपासचे शेजारी मदतीसाठी धावून आले. यामुळे ते दोन्ही कर्मचारी तेथून पळून गेले, असे या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अज्ञात कर्मचाऱ्यांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल साहेबराव खेडकर करीत आहेत.



