नवापूर न.प.चा अर्थसंकल्प ५०.५२ कोटींचा; ८ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावरच खर्च होणार; आरोग्य, स्वच्छता, रस्ते बांधणीवर भर
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर नगर पालिकेच्या सण २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या ५० कोटी ५२ लाख ९ हजार ४३० रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. यंदा पालिकेने आरोग्य, स्वच्छता व साफसफाई आणि रस्ते काँक्रीटीकरण व दुरुस्तीवर भर दिला असून, आगामी वर्षात पालिकेचा सर्वाधिक सुमारे ८ टक्के खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांसाठी होणार असल्याचे या अर्थसंकल्पातील तरतुदींवरून स्पष्ट होत आहे.
पालिकेची विशेष अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष नरेंद्र जगदाळे, मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्यासह नगर पालिकेचे सर्व सदस्य उपस्थित होते. या विशेष सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पाला एकमताने मंजुरी देण्यात आली.
या अर्थसंकल्पातील आकडेवारी पाहता मागील वर्षाची शिल्लक रक्कम दोन कोटी ८० लाख ३७ हजार ४८४ रुपये असून, आता जमा रक्कम ४८ कोटी ८ लाख ७१ हजार ९४६ रुपये आहे. एकूण अर्थसंकल्प ५० कोटी ५२ लाख ९ हजार ४३० रुपयांचा आहे. या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद सहा कोटी ५४ लाख रुपयांची तरतूद कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांसाठी करण्यात आली असून, ही रक्कम एकूण अर्थसंकल्पाच्या ७.७२ टक्के इतकी होते. याशिवाय पाणीपुरवठा व जलसंधारण योजनांसाठी ३की कोटी ९५ लाख ५४ हजार, आरोग्य सुविधांसाठी तीन कोटी ३२ लाख ४० हजार, स्वच्छता व साफसफाईसाठी ४८ लाख ५४ हजार ४२८, रस्ता काँक्रीटीकरण व दुरुस्तीसाठी ५ कोटी ५० लाख, अग्निशमन सेवेसाठी ८ लाख, स्ट्रीट लाईटसाठी पाच लाख ५२ हजार ८६५, महिला व बालकल्याणासाठी ५ लाख २५ हजार ४२८, वीज साहित्य खरेदीसाठी ५ लाख, दिव्यांगांसाठी ५ लाख २५ हजार ४२८, दफनभूमी विकासासाठी ५ लाख, वीज बिलासाठी ६ लाख, अन्नधान्य पुरवठ्यासाठी ६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या सभेला नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, बांधकाम अभियंता, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती. हा अर्थसंकल्प नवापूर शहराच्या विकासाला चालना देणारा आहे, असा विश्वास नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी व्यक्त केला.



