नंदुरबारकरांनो आता भरा १२५० रुपये पाणीपट्टी; यंदा २५ टक्क्यांची वाढ; २२५ चौ.फुटांपर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ; न.प.चे १९४.८६ कोटींचे अंदाजपत्रक ‘स्थायी’मध्ये मंजूर

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरवासीयांना आगामी आर्थिक वर्षापासून एक हजार २५० रुपयांची वार्षिक पाणीपट्टी भरावी लागणार आहे. कारण नगर परिषदेने पाणीपट्टीमध्ये २४४ रुपयांची वाढ मंजूर केली असून, सोबतच नगर परिषद हद्दीतील २२५ चौरस फुटांपर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
नंदुरबार नगर पालिकेचे सन २०२६-२७ या वर्षासाठीचे १९४ कोटी ८६ लाख ८६ हजार ६८६ रुपयांचे पालिकेच्या स्थायी समितीकडून मंजूर करण्यात आले. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची विशेष बैठक पार पडली.
म्हणून करावी लागली दरवाढ
नगर परिषदेने २०१० मध्ये १००६ रुपये पाणीपट्टी निश्चित केली होती. तेव्हापासून गेल्या १६ वर्षांपासून पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. या काळात वीज दर, पाईपलाईनची देखभाल-दुरुस्ती आणि मनुष्यबळ यांच्यावरील खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, पाणीपट्टीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न मात्र जैसे थे राहिले आहे. यामुळे नगर परिषदेला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण होऊन बसले आहे. त्याचवेळी शहर विकासाचे उद्दिष्ट सध्या करताना खर्चाबरोबरच उत्पन्न वाढीचा ताळमेळ घालण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढवावेत, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार नगर परिषदेने खर्च व उत्पन्नाचा मेळ घालण्याच्या हेतूने आणि पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम व टिकावू करण्यासाठी पाणीपट्टी २४४ रुपयांनी वाढवून १२५० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा रत्ना सूर्यवंशी यांनी दिली.
पाणीपुरवठ्यावरील एकूण खर्च पाहता पाणीपट्टी ६०० ते ७०० रुपयांनी वाढविण्याची गरज होती. परंतु, पालिकेने साहारवासियांचा विचार करून अवघ्या २४४ रुपयांची वाढ केली असून, यातून शहरातील नागरिकांवर खूप आर्थिक भर पडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, असे रघुवंशी म्हणाल्या. याशिवाय शहरातील छोट्या म्हणजेच २२५ चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफ़ळ असलेल्या घरांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णयही नगर पालिकेने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नंदुरबार शहरातील नागरी सुविधा, पायाभूत सोयी-सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, आणि शहरवासीयांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून नगर परिषदेने आगामी आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस ६ कोटी ६९ लाख ८६ हजार ६८६ रुपये शिल्लक राखण्यात येणार आहेत. तसेच मागील वर्षाची ४५ कोटी ३ लाख लाखांपेक्षा अधिक रकमेची प्रारंभिक शिल्लक गृहीत धरून कर महसूल, शासकीय अनुदान, मालमत्तांतून होणारे उत्पन्न, विविध योजना व विविध विशेष परयोजनांसाठी प्राप्त होणारी अनुदाने यांचा सुनियोजित वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, स्थायी समितीने मंजूर केलेले हे अंदाजपत्रक आता सर्वसाधारण सभेसमोर चर्चा व मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
विरोधक संतापले
अंदाजपत्रकाची प्रत आधीच न दिल्यामुळे विरोधकांना त्याचा अभ्यास करता आला नाही आणि साहजिकच त्यामुळे त्यावर हरकती पण मांडता आल्या नाहीत, अशा शब्दांत विरोधी गटाने अंदाजपत्रकावर हरकत घेतली. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षाचे गटनेते हिरालाल चौधरी यांनी मुख्याधिकारी सुधांशु सिंह यांना यासंदर्भात निवेदन सादर केले.



