गुन्हे वार्ता

धडगाव तालुक्यात मद्य तस्करांचा धुमाकूळ; ‘दारूबंदी’ पथकावर जमावाचा हल्ला; जप्त केलेल्या १४.४० लाखांच्या दारूसह ५ लाखांचे वाहनही पळवले!

धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता धडगाव तालुक्यातही या विभागाच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. धडगाव तालुक्यातील निगदीनजीक जमावाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर दगडफेक करतानाच त्यांनी जप्त केलेला दारूसाठा आणि त्यांच्या ताब्यातील वाहन देखील पळवून नेले. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री व वाहतूक सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार या विभागाचे पथक निगदीनजीक पोहोचले. तेथे त्यांनी निगदी -धडगाव रस्त्यावर एका संशयित वाहनाला (एमएच ०५ बीएच ३७३४) अडवून तपासणी सुरु केली. वाहनांची झडती घेतली असता त्यात १४ लाख ४० हजार रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा आढळून आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही दारू जप्त करून त्याचा पंचनामा सुरु केला.
याचवेळी बुधा कोमा झांगडे व सुरेश कोमा झांगडे (दोघेही रा. निगदी, ता. धडगाव, जि. नंदुरबार) हे दोघे आणखी १० ते १२ जणांना घेऊन तेथे आले. या सर्वांनी काही कळण्याच्या आतच पथकावर दगडफेक सुरू केली. यामुळे एकच गोंधळ उडाला. याचवेळी झांगडे बंधूंनी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडे जप्त केलेला दारूचा साठा परत देण्याची मागणी केली. पथकाने त्यास नकार देताच जमावाने पथकाची गाडी अडवून वाहन पुढे नेल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी चालकाला दिली. एवढेच नाही तर जमावाने वाहनावर ताबा मिळवून दारूसाठ्यासह वाहन पळवून नेले.
जमावापुढे हतबल झालेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अखेर तेथून पळ काढून धडगाव पोलीस ठाणे गाठले. तेथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेश सपकाळ यांनी बुधा कोमा झांगडे व सुरेश कोमा झांगडे यांच्यासह इट १० ते १२ जणांविरोधात रितसर फिर्याद नोंदवली. या सर्वांनी गैरकायद्याने एकत्र येत १४ लाख ४० हजार रुपये किमतीचा विदेशी दारूचा जप्त केलेला साठा आणि पाच लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण १९ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पळवून नेल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पथक शांत कसे राहिले?
जमावाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर खुलेआम हल्ला केल्याने अनेक प्रश्नांचा जन्म झाला आहे. दऱ्याखोऱ्यात कारवाई करायला जाताना राज्य उत्पादन शुल्क विभाग पूर्वतयारी करीत नाही का, जमाव व्हॅन आणि दारूचा साठा पळवून नेत असताना या पथकाने प्रतिकार का केला नाही, जमावाचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांना पळवून लावण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे शस्रे नव्हती का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने जिल्हाभर चर्चिले जात आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button