आधी गाडीत बसवून घेतले अन् मग वाहन डोंगर रस्त्यावर येताच हात धरून बळजबरीचा प्रयत्न; अक्कलकुवा तालुक्यातील धक्कादायक प्रकार
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : वैयक्तिक कामासाठी निघालेल्या १८ वर्षांच्या तरुणीला आपल्या खासगी वाहनात बसवीं डोंगरी भाग आल्यावर गाडीतच तिचा हात धरून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना अक्कलकुवा तालुक्यात घडली. या प्रकरणी एकाविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील एक १८ वर्षे ८ महिने वय असलेली तरुणी वैयक्तिक कामानिमित्त घराबाहेर पडली होती. याच दरम्यान तेथून चाललेल्या सुरेश विरजी पाडवी (रा. सल्लीबाजार, ता. अक्कलकुवा) याने त्या तरुणीला जायचे तिकडे सोडवतो असे सांगत आपल्या खासगी वाहनात बसवून घेतले. हे वाहन धडगाव तालुक्यातील एका डोंगरी भागातील गावाजवळ येताच संशयिताने वाहन थांबवून तरुणीचा हात धरून तिला जवळ ओढत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध करताच संशयिताने तिला ठार मारण्याची धमकी देखील दिली.
पीडित तरुणीने या प्रसंगातून कशीबशी सुटका करून घेत अखेर घर गाठून कुटुंबियांना आपबिती सांगितली. यानंतर तिच्या वडिलांनी धडगाव पोलीस ठाणे गाठून संबंधित संशयित सुरेश पाडवी याच्याविरोधात रितसर फिर्याद दाखल केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



