शहादा तालुक्यातील ४६५० कुमारिकांना मिळणार कॅन्सरपासून संरक्षण; सहा हजारांची एचपीव्ही लस मिळणार मोफत, मोहिमेचा १६ मार्चला शुभारंभ
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : १४ ते १५ वयोगटातील मुलींना देण्यात येणार्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा सोमवारी (दि.१६ मार्च) रोजी शहादा तालुक्यात शुभारंभ होत आहे. ही लस स्त्रियांमधील गर्भाशय मुख कॅन्सरचे प्रमाण कमी करण्यासह व मृत्युदर घटविण्यात मदत करणार असून, ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र वळवी यांनी दिली.
केंद्र शासनाने १४ ते १५ या वयोगटातील कुमारींना एचपीव्ही प्रतिबंधक लसीकरण मोहीम देशभरात सुरू केली असून, राज्यात आठ मार्चला याचा शुभारंभ झाला. आता सोमवारपासून शहादा तालुक्यात ही मोहिम सुरू होत आहे. शहादा तालुक्यात ग्रामीण व शहरी भागातील १७ लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आले असून, यात वाघर्डे, कुसुमवाडा, पाडळदा, कलसाडी, प्रकाशा, सुलवाडा, आडगाव, राणीपूर, पुरुषोत्तम नगर, मंदाणा, शहाणा कहाटूळ, वडाळी, सारंगखेडा या १४ ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रासह म्हसावद ग्रामीण रुग्णालय, शहादा ग्रामीण रुग्णालय व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शहादा यांचा समावेश आहे.
पूर्वतयारी
एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्यापूर्वी शाळांचे कर्मचारी आणि आशा वर्कर्सच्या माध्यमातून मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले. लस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना लसींचे वाटपही झाले आहे. लसीच्या साठवणूक व सुरक्षेसाठीची साधनेही उपलब्ध करण्यात आली आहेत.
शहादा तालुक्याची लोकसंख्या चार लाख ८० हजार असून, त्याच्या एक टक्के गट या लसीच्या साठी निर्धारित करण्यात आला आहे. येत्या ९० दिवसात शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागातून ४६५० कुमारींना ही लस देण्यात येणार आहे. यात चार हजार २८७ शालेय मुली तर ३६३ शाळाबाह्य मुलींचा समावेश आहे. शहरी भागात हे प्रमाण ८५० तर उर्वरित संख्या ग्रामीण भागातील आहे.
आधार कार्ड, पालकांची संमती आवश्यक…..
नंदुरबार जिल्ह्यासाठी गार्ड सील ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाजारात या लसीची किंमत पाच ते सहा हजार रुपये असून शासनामार्फत ती मोफत देण्यात येत आहे. या मोहिमेत लाभार्थ्यांना एकच लस देण्यात येईल. निर्धारित वयोगटातील मुलींनी पालकांसोबत प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय किंवा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊनच ही लस घ्यायची आहे. लस घेताना वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड व पालकांची संमती आवश्यक आहे. लस घेण्यापूर्वी जेवण किंवा नाश्ता करून येणे आवश्यक आहे, असे आरोग्य यंत्रणेने कळवले आहे.
पालकांनो, मुलींनो घाबरू नका…
एचपीव्ही प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित आहे. ही लस घेतलेल्या मुलींचे भविष्यात महिलांना होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण करील. खुल्या बाजारात ही लस महागडी असून, शासनामार्फत मोफत दिली जात आहे. पालकांनी आपल्या १४ वर्षे वयोगटातील मुलींना ही लस आपल्या संमतीने देऊन या मोहिमेस सहकार्य करावे येत्या दोन-तीन महिन्यात ज्यांचा पंधरावा वाढदिवस येणार आहे त्यांनी प्राधान्यक्रमाने ही लस घेणे आवश्यक आहे.
-डॉ राजेंद्र वळवी (तालुका आरोग्य अधिकारी, शहादा)



