गुन्हे वार्ता

नंदुरबारमध्‍ये दंगल घडवण्याचा डाव उलटला : खोटी फिर्याद देण्‍यासाठी उचकावले, पण कॉल रेकॉर्डिंगने केला भंडाफोड, आता ‘ते’ तिघेच अडकले

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : दोन धर्मांमध्‍ये दंगल उसळावी या हेतूने ‘आम्‍हाला बळजबरी जय श्रीरामच्‍या घोषणा देण्‍यास भाग पाडले’ अशी फिर्याद देण्‍यासाठी उचकावणे नंदुरबार तिघांना महागात पडले आहे. कारण ही फिर्याद खोटी असल्‍याचे आरोपींच्‍या मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमधून स्‍पष्‍ट झाले असून, आता पोलिसांनीच त्‍यांच्‍या खोटेपणावर प्रहार करीत त्‍यांच्‍यावरच दोन धर्मांत दंगल घडवून आणण्‍यासाठी खोटी फिर्याद देण्‍यासाठी खोटे बोलायला लावल्‍याचा गुन्‍हा दाखल केला आहे.
नंदुरबार शहरातील मौसिम अब्‍दुल धोबी याला तरुणांनी मारहाण केल्‍याची घटना घडली होती. या प्रकरणी त्‍याने नंदुरबार शहर पोलिस ठाण्‍यात रितसर तक्रारही नोंदवली होती. मात्र, येथेच या प्रकरणाला ट्विस्‍ट आला. कारण, या प्रकरणात मौसिम याने ज्‍यांच्‍याविरोधात मारहाण केल्‍याची तक्रार केली होती, ते तिन्‍ही तरुण हिंदू समाजाचे होते. याच दरम्‍यान मौसिम पोलिस ठाण्‍यात फिर्याद दाखल करीत असतानाच त्‍याला एका नंबरवरून मोबाईल कॉल आला आणि समोरून बोलणार्‍या व्‍यक्‍तीने मौसिमला ‘आपल्‍याकडून पण दोन तीन गोष्‍टी लिहून टाकायच्‍या. Aत्‍यांनी मारहाण करताना बळजबरीने जय श्रीराम म्‍हणायला भाग पाडले, असे तक्रारीत नमूद कर, त्‍यामुळे मजबूत केस होईल’, असे फिर्यादीत लिहिण्‍यास सांगितले. तशी रेकॉर्डिंगच एका आरोपीच्‍या मोबाईलमध्‍ये पोलिसांना आढळली. तर अन्‍य एका आरोपीच्‍या मोबाईलची तपासणी केल्‍यावर त्‍यात ‘माज बोलतोय. काय झाले सिव्‍हिलमध्‍ये, कारवाई झाली की नाही? गुन्‍हा दाखल झाला ना सगळ्‍यांवर. सगळ्‍या सहा जणांवर गुन्‍हा दाखल झाला ना? फक्‍त सहा नाही, सगळ्‍यांवर कर. सांग की धमक्‍या देऊन घाबरवत होते, मारहाण करीत होते’, अशा स्‍वरूपाची रेकॉर्डिंग पोलिसांना आढळली.
अगा, जे घडलेचि नाही…
प्रत्‍यक्षात मौसिम अब्‍दुल धोबी याने पोलिस ठाण्‍यात मारहाणीची घटना सांगताना असे काहीही नमूद केले नव्‍हते. पोलिसांनी त्‍या फिर्यादीची पडताळणी केल्‍यावर बळजबरी ‘जय श्रीराम’ची घोषणा द्यायला भाग पाडण्‍यात आल्‍यासारखी घटना प्रत्‍यक्षात घडलीच नसल्‍याचे उघड झाले. त्‍यामुळे तिन्‍ही आरोपींनी दोन धर्मांमध्‍ये दंगल घडवून आणण्‍याच्‍या उद्देशानेच कट रचून बनावट फिर्याद देण्‍यासाठी संबंधिताला उचकावल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.
या सगळ्‍या प्रकाराचे गांभिर्य ओळखून त्‍याची दखल घेत खुद्द पोलिसांनीच आता समीर खान शेर खान पठाण (२६, रा. पटेलवाडी, नंदुरबार), शाहरूख खान रहिम खान पठाण ऊर्फ मास (२९, रा. जुना बैल बाजार, नंदुरबार) आणि शेख शोएब शेख फारुक ऊर्फ माज (२६, रा. काली मशिद जवळ, नंदुरबार) या तिघांच्‍या विरोधात भारतीय न्‍याय संहितेच्‍या कलम १९२, ३५३ (२), ३ (५) या कलमान्‍वये नंदुरबार शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. त्‍यांच्‍यावर जाणीवपूर्वक दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होण्‍याच्‍या उद्देशाने खोटे बोलून फिर्याद दाखल करण्‍यासाठी प्रोत्‍साहन दिल्‍याचा आरोप ठेवण्‍यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांच्‍या वतीने भुनेश नारायण मराठे यांनी फिर्याद दाखल केली असून, आता सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button