नंदुरबार जिल्हा

गुड न्‍यूज : नंदुरबारमधील पालिका क्षेत्रातील विकास कामांना मिळणार गती; १५व्‍या वित्त आयोगाचे ५.७९ कोटी कोणत्‍याही क्षणी मिळणार

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्यातील चार नगर परिषदा आणि एका नगर पंचायत क्षेत्रातील रखडलेल्‍या विकास कामांना गती मिळण्‍याचे संकेत मिळाले आहेत. कारण सन २०२१ -२२ ते २०२५ -२६ या कालावधीसाठी गठित पंधराव्‍या वित्त आयोगाचा सुमारे ५ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी कोणत्‍याही क्षणी या नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्‍या खात्‍यात वर्ग केला जाणार आहे. तब्‍बल तीन वर्षे रखडलेला हा निधी मिळणार असल्‍याने साहजिकच नंदुरबार जिल्‍ह्यातील पाचही शहरांतील मुलभूत सोयीसुविधांच्‍या कामांना वेग मिळणार आहे.
सन २०२१ -२२ ते २०२५ -२६ या कालावधीसाठी गठित पंधराव्‍या वित्त आयोगाच्‍या शिरारशीनुसार स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांना विकास कामांसाठी निधी देण्‍याचे निश्‍चित करण्‍यात आले होते. मात्र, गेल्‍या तीन वर्षांपासून हा निधी देण्‍यात आला नव्‍हता. तसेच निवडणुका रखडल्‍यामुळे आणि प्रशासकराज असल्‍यामुळे नंदुरबार जिल्‍ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या चार नगर पालिका आणि धडगाव नगर पंचायतीला २०२५-२६ मध्‍येही हा निधी मिळाला नव्‍हता. मात्र, आता हा निधी वितरीत करण्‍याचा शासन आदेश जारी झाल्‍याने या नगर परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्‍या मुलभूत सोयीसुविधा मिळण्‍याच्‍या आशा उंचावल्‍या आहेत.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नंदुरबार जिल्‍ह्यातील चार नगर परिषदा आणि धडगाव नगर पंचायतीला मिळून एकूण ५ कोटी ७८ लाख ९८ हजार १३४ रुपयांचा निधी मिळणार आहे. येत्‍या आठवडाभरात हा निधी संबंधित स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या खात्‍यात वर्ग होण्‍याची शक्‍यता आहे.
तीन वर्षांपासून अडकली होती कामे
गेल्‍या तीन वर्षांपासून हा निधी रखडल्‍याने जिल्‍ह्यातील पालिकांची आर्थिक स्‍थिती डबघाईला आली होती. त्‍यातच मालमत्ता कर, पाणीपट्टीसह इतर करही वसूल होत नसल्‍याने विकासकामे कशी करायची, असा प्रश्‍न या संस्‍थांना पडला होता. काही ठिकाणी तर केलेल्‍या कामाचे पैसेही न मिळाल्‍याने ठेकेदारांनी काम करणेच सोडून दिले होते. मात्र, आता हा निधी मिळणार असल्‍याने या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांना त्‍यातून पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या योजना, सांडपाणी व गटार व्‍यवस्‍था, घनकचरा व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प, स्‍वच्‍छता व आरोग्‍यविषयक सुविधा, सार्वजनिक स्‍वच्‍छता व कचरा संकलन अशी विविध कामे करता येणार आहेत.
कुणाला किती निधी मिळणार?
नंदुरबार नगर परिषद : २ कोटी ६४ लाख १ हजार ७३२ रुपये
शहादा नगर परिषद : १ कोटी ३६ लाख २ हजार २०५ रुपये
नवापूर नगर परिषद : ८४ लाख ३३ हजार ६३ रुपये
तळोदा नगर परिषद : ४९ लाख ५६ हजार ३५१ रुपये
धडगाव नगर पंचायत : ३४ लाख ८१ हजार ६४५ रुपये
—————————————————————-
एकूण :            ५ कोटी ७८ लाख ९८ हजार १३४ रुपये

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button