नंदुरबार जिल्हा

नवापुरच्‍या विसरवाडीत गावकर्‍यांवर मधमाशांचा हल्‍लाबोल; अनेकांना चावा; ५ ते ७ जण जखमी, एक महिला गंभीर

विसरवाडी (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्याच्‍या नवापूर तालुक्‍यातील विसरवाडीच्‍या बाजारपेठेत रविवारी सायंकाळी जोरदार गोंधळ उडाला. मधमाशांनी गावकर्‍यांवर केलेल्‍या हल्‍ल्‍यात पाच ते सात जण जखमी झाले असून, यापैकी एका महिलेला मधमाशांनी तब्‍बल ३० ते ३५ ठिकाणी चावा घेतल्‍याचे समोर आले आहे. संध्‍याकाळी गडबडीच्‍या वेळी अचानक झालेल्‍या या प्रकारामुळे बाजार परिसरात प्रचंड धावपळ उडाली होती.
प्रत्‍यक्षदर्शी आणि सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, विसरवाडी गावातील बाजारपेठ परिसरात सायंकाळी ७ वाजेच्‍या फिरणार्‍यांवर मधमाशांचा थवा एकदम चालून आला. पंचक्रोशीतील नागरिक विसरवाडी बाजारपेठेतून खरेदी करून पुन्‍हा गावाकडे परतण्‍याच्‍या तयारीत असतानाच अचानक मधमाशांचा मोठा थवा बाजारपेठेकडे आला. त्‍यांनी दिसेल त्‍याला डंख मारण्‍यास सुरूवात केल्‍याने त्‍या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. प्रत्‍येक जण मधमाशांपासून बचावासाठी सैरावरा धावू लागला. मिळेल तो आडोसा शोधून लपून बसू लागला. अनेकांनी बाजारपेठ परिसरात असलेल्‍या दुकानांत शिरून तेथील शटर तसेच लाईट बंद करून घेतले. तर काही जण तेथील इमारतींच्‍या कोपर्‍यावर आडोसा घेतला. प्रत्‍येक जण मधमाशांपासून बचावासाठी जागा मिळेल तिकडे धावत असल्‍याने काहीतरी अवचित घडल्‍याच्‍या शंकेने अनेकांच्‍या मनात धडकी भरली होती.
याच दरम्‍यान बाजारपेठेतील एका टेलरिंग दुकानात काम करणार्‍या गुजरातील टेलरवर मधमाशा चाल करून गेल्‍या. त्‍या टेलरला दिसेल त्‍या ठिकाणी चावा घेतला. तर बाजूलाच रस्‍त्‍याच्‍या कोपर्‍यावर उभ्‍या असलेल्‍या एका दिव्‍यांग महिलेवरही मधमाशा तुटून पडल्‍या. त्‍या महिलेला तोंड, डोळे, ओठ अशा ठिकाणी तब्‍बल ३० ते ३५ चावे घेतले. यात ही महिला गंभीर जखमी झाली. ही महिला विव्‍हळत असल्‍याने काही जणांनी तिला तातडीने विसरवाडीच्‍या ग्रामीण रुग्‍णालयात दाखल केले. गंभीर जखमी अवस्‍थेतील या महिलेवर तेथील डॉक्‍टरांनी तातडीने उपचार करून मधमाशांचे डंख काढले. यामुळे या महिलेचा जीव वाचला. दुसरीकडे, मधमाशांच्‍या हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या इतरांनी खासगी रुग्‍णालयांत उपचारासाठी धाव घेतल्‍याचे काही जणांनी सांगितले.
दरम्‍यान, विसरवाडी बाजारपेठ भागातील एका इमारतीच्‍या वरच्‍या मजल्‍यावरील कोपर्‍यात असलेल्‍या मधमाशांच्‍या पोळ्‍याला परिसरातील काही लहान मुलांनी दगड मारल्‍याने मधमाशांनी चवताळून गावकर्‍यांवर हल्‍ला केल्‍याचे सांगण्‍यात येते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button