नंदुरबार जिल्हा

सूर्य कोपला : शहादाच्‍या सुलवाडा शिवारात टरबुजाचे पिक करपले, उन्‍हाचा पारा चाळीशीपार गेल्‍याचा परिणाम, शेतकर्‍याचे २.५ लाखांचे नुकसान

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : उन्‍हाळ्‍याच्‍या सुरूवातीलाच तळपत्‍या उन्‍हाचा मोठा फटका शहादा तालुक्‍यातील सुलवाडा शिवारात एका शेतकर्‍याला बसला असून, वाढलेल्‍या तापमानामुळे या शेतकर्‍याच्‍या शेतातील टरबुजाचे पिक करपून गेल्‍याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात या शेतकर्‍याच्‍या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, त्‍याच्‍या डोळ्‍यात अश्रू तरळले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, शहादा तालुक्‍यातील म्‍हसावद येथील रवींद्र युवराज अहिर या शेतकर्‍याचे सुलवाडा गावाच्‍या शिवारात शेत आहे. या शेतात त्‍यांनी सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करून टरबुजाची लागवड केली होती. पिकही चांगले आले होते. काढणी सुरू केल्‍यापासून त्‍यांच्‍या शेतातील टरबुजांना मागणीही चांगली होती. मात्र, २५ ते ३० टक्‍के टरबुजांच्‍या विक्रीतून त्‍यांचा खर्चही निघाला नव्‍हता तोच त्‍यांच्‍या निसर्गाचा कोप झाला आहे.
मार्च महिन्‍याचा पहिल्‍या पंधरवाड्यातच उन्‍हाचा पारा चाळीस अंशांच्‍या पुढे गेला असून, सामान्‍य जीवन आताच विस्‍कळीत झाले आहेत. त्‍यातच टरबुज पिकाला २८ ते ३० अंशांच्‍या आसपास तापमान लागते. मात्र, पारा चाळीस अंशांच्‍या पुढे गेल्‍याने त्‍याचा परिणाम अहिर यांच्‍या शेतातील टरबुजांवर होऊन अवघ्‍या शेतातील संपूर्ण पिक करपून गेले आहे. यामध्‍ये त्‍यांचे सुमारे २.५ लाख रुपयांचे नुकसान झाल्‍याचे सांगण्‍यात येते.
दरम्‍यान, यामुळे रवींद्र अहिर यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, त्‍यांच्‍यावर रडण्‍याची पाळी आली आहे. आता शासकीय यंत्रणेने याचा पंचनामा करून मदत मिळवून द्यावी, अशी त्‍यांची मागणी आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button