नंदुरबार जिल्हा

गरिबांना १० रुपयांत जेवण देणारेच उपाशी; नंदुरबार जिल्‍ह्यातील शिवभोजन केंद्रांचे २.७० कोटी अडकले; ८ महिन्‍यांपासून मिळेना अनुदान

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : कोरोना काळात गरीब व गरजूंना अत्‍यल्‍प दरात ताजे व सकस अन्न देण्‍यासाठी सुरू करण्‍यात आलेली शिवभोजन थाळी योजना शेवटच्‍या घटिका मोजत असल्‍याचे चित्र आहे. या योजनेंतर्गत नंदुरबार जिल्‍ह्यात सुरू केलेल्‍या ३२ केंद्रांना आठ महिन्‍यांपासून अनुदान मिळाले नसून, त्‍यांचे तब्‍बल २ कोटी ७० लाख रुपये सरकारकडे अडकून पडले आहेत. यामुळे या केंद्र चालकांना गरिबांना १० रुपयांत जेवण वाटणे कठीण चालले असून, गरिबांना अल्‍पदरात जेवण देणार्‍यांवरच उपाशी राहण्‍याची वेळ आल्‍याची भावना उमटत आहे.
नंदुरबार जिल्‍ह्यात एकूण ३२ शिवभोजन केंद्र असून, त्‍यापैकी अक्‍कलकुवा येथील एक केंद्र गेल्‍या काही दिवसांपासून बंद आहे. उर्वरित सुरू असलेल्‍या ३१ केंद्रांतून दररोज ३ हजार २२० थाळ्‍यांचे वितरण केले जाते. यात शासकीय नियमानुसार केंद्रचालक लाभार्थ्यांकडून प्रतिथाळी १० रुपये घेतात. तर उर्वरित खर्चापोटी शहरी भागातील शिवभोजन केंद्र संचालकांना प्रतिथाळी ४० रुपये, तर ग्रामीण भागातील केंद्रांना २५ रुपये दिले जातात.
मात्र, नंदुरबार जिल्‍ह्यातील सर्वच शिवभोजन केंद्रांचे अनुदान तब्‍बल ८ महिन्‍यांपासून रखडले असून, सध्‍या खिशातून पैसे टाकून या केंद्रांचे संचालक केंद्रांचा कारभार हाकत आहेत. यासंदर्भात नंदुरबार येथील शिवभोजन केंद्राचे संचालक सचिन चौधरी यांनी सांगितले की, अन्नधान्‍य, इंधनासह इतर खर्च वाढल्‍याने आधीच शिवभोजन केंद्र चालवणे कठीण झाले आहे. त्‍यातच ८ महिन्‍यांपासून सरकारकडून खर्चापोटी मिळणारे अनुदान रखडले आहे. व्‍याजाने पैसे काढून आम्‍ही गरिबांची भूक भागवत आहोत, पण आता आमच्‍यावरच उपाशी राहण्‍याची वेळ आली आहे.
दरम्‍यान, सहायक पुरवठा अधिकारी विशाल भगत यांनीही शिवभोजन केंद्रांचे मानधन रखडल्‍याचे मान्‍य केले. यापोटी सरकारकडे २.७ कोटी रुपयांची मागणी केली असून, निधी मिळताच शिवभोजन केंद्रांना रकमेचे वितरण केले जाईल, असे भगत म्‍हणाले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button