नंदुरबारमध्ये प्रेमप्रकरणातून राडा : शहादा तालुक्यातील युवकाला टोळीने घेरून मारले, गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधांच्या वादातून एका युवकाला पाच ते सहा जणांनी एकत्र येत जबर मारहाण केल्याची घटना नंदुरबार– वावद रस्त्यावर घडली. या घटनेत मारहाण झालेला युवक जबर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील राहुल संजय गिरासे (२७) हा नंदुरबारमध्ये शिक्षण घेतो. त्याचे कबरे, ता. शिंदखेडा येथील तुषार झिपेसिंग गिरासे याच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. या संबंधांवरून राहुल व संजय यांच्यात वाद होता. दोन दिवसांपूर्वी राहुल नंदुरबार-वावद रस्त्याने जात असताना तुषार व त्याच्या चार ते पाच सहकार्यांनी स्वामी समर्थ केंद्राजवळ अडवले. तेथे त्याला लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. त्याचा मोबाईल देखील फोडून टाकण्यात आला. एवढेच नाही तर शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
नंतर राहुल याला नंदुरबारच्या छत्रपती मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तेथे सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राहुल गिरासे याच्या तक्रारीवरून नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात तुषार गिरासे व इतर ४ ते ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जयसिंग परदेशी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.



