गॅस टंचाईवर राज्य सरकारचा उतारा : पेट्रोल पंपावर केरोसिन उपलब्ध करून देण्याची तयारी, भुजबळांनी केली घोषणा
मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यात घरगुती गॅसच्या कथित टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याच्या हेतूने अखेर राज्य सरकारने गॅस सिलिंडर न मिळणार्या ग्राहकांना केरोसिन (रॉकेल) उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात निवेदन करताना ही माहिती दिली.
राज्यातील कथित गॅस टंचाईवर बोलताना भुजबळ म्हणाले, बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असून, त्यांनी राज्यातील घरगुती गॅसचे दैनंदिन उत्पादन दोन हजार मेट्रिक टनांनी वाढवून ११ हजार मेट्रिक टन केल्याची माहिती दिली आहे. एलपीजी उत्पादनातील अडचणी दूर कलन घरगुती गॅसच्या उत्पादनाला प्राधान्य देण्यात आले आहे.
यावेळी भुजबळ यांनी केरोसिनच्या वापराबाबत भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात केरोसिनचा भरपूर साठा आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसिन द्यायची गरज नाही, असे निर्देश मध्यंतरी न्यायालयाने दिले होते. मात्र, आता यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सरकारने न्यायालयालाही अवगत केले आहे. त्यानुसार केरोसिन डिलर्सही केरोसिन देऊ शकतील. परंतु, मध्यंतरी केरोसिनचा वापर पूर्णत: बंद केल्याने केरोसिन डिलर्सची साखळी तुटली होती. त्यावर तोडगा म्हणून बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या कंपन्यांच्या पंपांवर केरोसिन उपलब्ध करुन दिले जाईल.
एलपीजीचा विषय हा केंद्र सरकारचा असून, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. गॅसच्या काळ्याबाजारावर लक्ष ठेवले जात असून, आतापर्यंत कारवाईत १ हजार २०८ गॅस सिलिंडर आणि ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहितीही भुजबळ यांनी सभागृहात दिली.


