नंदुरबार जिल्हा

राम-रहिम नांदतील एकत्र, शिंपडतील एकात्‍मतेचे ‘इत्र’; शहाद्यातील शांतता समितीच्‍या बैठकीत दोन्‍ही समाजांनी दिला एकतेचा संदेश

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि सर्व सण शांततेत व सलोख्याने पार पडावेत, यासाठी शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी सर्वच समाजातील बांधवांनी उपस्‍थित राहत, सर्व सण–उत्‍सव एकत्रितपणे व शांततेत साजरे करण्‍याची ग्‍वाही दिली.
उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी पवार यांनी विविध सणांच्या काळात शहरात शांतता, सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्य राखण्याचे आवाहन केले. तसेच सर्वच समाज बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.
या बैठकीला शहादा पोलिस ठाण्‍याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सरकारी वकील सुवर्णसिंग गिरासे, शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, एमएसईबीचे उपविभागीय अभियंता तिरुपती पाटील यांच्यासह हिंदू व मुस्लिम समाजातील मान्यवर मंडळींची उपस्‍थिती होती.
बैठकीदरम्यान सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना शहरात शांतता व बंधुभावाचे वातावरण कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य करण्याची ग्‍वाही दिली. आगामी सण उत्सव शांततेत, उत्साहात आणि परस्‍पर सलोख्याने साजरे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button